‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भगवंत आहेत’, असा भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६७ वर्षे) !

फोंडा, गोवा येथील श्रीमती भारती पालन (वय ६७ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्वतः रुग्णाईत असतांना आणि मुलगी जवळ नसतांना साधिकांनी मुलीप्रमाणे काळजी घेणे, तेव्हा ‘हे सर्व नियोजन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केले आहे’, या  जाणिवेने भावजागृती होणे

‘माझी मुलगी कु. योगिता पालन कधी कधी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी रात्री थांबायची, तेव्हा मला ते स्वीकारता येत नव्हते. एकदा योगिताला भक्तीसत्संगाच्या सेवेसाठी काही दिवस आश्रमात रहायचे होते आणि त्याच कालावधीत मी रुग्णाईत होते. तेव्हा मला वाटायचे, ‘तिला माझी काळजीच नाही, तिचे माझ्याकडे लक्ष नाही.’ माझ्या तिच्याकडून पुष्कळ अपेक्षा होत्या. तातडीच्या सेवांमुळे जेव्हा तिला आश्रमात रहावे लागायचे, तेव्हा ती रात्री माझ्या समवेत रहाण्यासाठी अन्य साधिकेचे नियोजन करत असे. त्या साधिका मला घरातील कामातही साहाय्य करत असत. येणार्‍या सर्वच साधिका माझ्या समवेत मुलीप्रमाणे प्रेमाने वागत होत्या. तेव्हा ‘हे सर्व नियोजन गुरुदेवांनीच केले आहे’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली.

२. प्रार्थनेचे जाणवलेले महत्त्व !

श्रीमती भारती पालन

२ अ. रात्री घरी एकटी असतांना भीती वाटणे; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर काळजी दूर होऊन निश्चिंतपणे झोपणे : नंतर १ – २ वेळा असे झाले की, योगिताला आश्रमात सेवेसाठी थांबावे लागले आणि तेव्हा तिला माझ्या समवेत रहाण्यासाठी कुणीच मिळाले नाही. त्या रात्री मी दारापुढे आसंदी ठेवून त्यावर प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र ठेवले आणि त्यांना आर्ततेने प्रार्थना केली. त्यानंतर ‘गुरुदेवच सर्व पहातील’, असे वाटून माझी भीती दूर झाली आणि मी रात्री निश्चिंतपणे झोपू शकले.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर साधनेपासून दूर चाललेला मुलगा पुन्हा चांगल्या प्रकारे साधना करू लागणे : ‘मध्यंतरी माझा मुलगा श्री. विनोद पालन काही प्रसंगांमुळे साधनेपासून दूर जात आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला त्याची पुष्कळ काळजी वाटू लागली. मी प्रतिदिन सकाळी आणि रात्री गुरुदेवांना आर्ततेने प्रार्थना करू लागले, ‘माझ्या मुलाला साधनेपासून दूर जाऊ देऊ नका.’ त्यानंतर तो पुन्हा काही प्रमाणात साधना आणि सेवा करू लागला. आता तोच आम्हाला सांगतो, ‘‘तुम्ही प्रतिदिन आश्रमात जाऊन सेवा करा आणि चांगली साधना करून पुढे जा. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही तुमची साधना पुढे वाढवा.’’ यावरून ‘माझी प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली’, हे माझ्या लक्षात आले आणि मला पुष्कळ आनंद झाला.

२ इ. मुलगा मुंबई येथे नोकरीसाठी एकटाच रहात असतांना त्याची काळजी वाटणे; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्यावर काळजी न्यून होणे : त्यानंतर काही दिवसांनी मुलगा विनोद मुंबईला नोकरी करण्यासाठी गेला. तेव्हा ‘तो मुंबईत एकटाच रहातो, तिथे त्याच्याकडे बघायलाही कुणी नाही, त्याचे जेवण इत्यादी सर्व बाहेरच असते. त्याचे कसे होणार ?’, इत्यादी विचारांनी मला त्याची काळजी वाटायची. तेव्हा मी प.पू. गुरुदेवांना अखंड आळवू लागले. त्यांना सतत आत्मनिवेदन करू लागले. मनात विचार येतील, तसे त्यांना सांगू लागले. त्यानंतर माझ्या मनातून मुलाविषयीच्या काळजीचे विचार हळूहळू न्यून झाले. ‘परम पूज्य आहेत. ते त्याला सांभाळतील. त्यांचे मुलाकडे लक्ष आहे’, अशी माझी श्रद्धा वाढली.

वरील प्रसंग समजल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे ?, किती सामर्थ्य आहे ?’, हे यातून सर्वांना शिकायला मिळाले.’’

३. आश्रमात प्रवेश करतांना आणि सेवा करतांना आनंद मिळणे

प्रवेशद्वारातून आश्रमात प्रवेश करतांना मला एक वेगळाच आनंद जाणवतो. धान्याच्या संबंधित सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळतो. आम्ही सर्व साधक प्रेमभावाने आणि आनंदाने एकत्र सेवा करतो.

४. प्रार्थना

‘गुरुदेव, सर्व साधक माझा परिवार असून गुरुदेव माझा भगवंत आहे’, असाच भाव माझ्या अंतरात सदैव राहू दे. आम्हा तिघांनाही तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी मी तुमच्या चरणी कळकळीने प्रार्थना करते.’

– श्रीमती भारती पालन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक