संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

  • देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या गुरुपादुकांचे आगमन !

  • प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांची उपस्थिती !

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे पूजन करतांना श्री. अविनाश गिरकर

श्री गुरु परम्गुरु परमेष्ठी गुरु । श्री सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः ॥

पनवेल – विश्वातील सर्व नद्या आणि तीर्थे यांचे चैतन्य ज्यात सामावले आहे, त्या गुरुचरणांच्या प्राप्तीसाठीच शिष्य तळमळत असतो ! शिष्य आणि भक्त यांच्या जीवनात गुरुपादुकांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. साधकाच्या हृदयमंदिरात विराजमान झालेले गुरुचरण हे त्याचे जीवनसर्वस्व असते…! साधक नेत्र मिटून संपूर्णपणे शरण जाऊन गुरूंना मानस नमस्कार करत असतो, त्या वेळी जेव्हा त्याच्या नेत्रांसमोर गुरुचरण किंवा गुरुपादुका यांचे दर्शन होते, तेव्हाच तो निश्चिंत होतो. गुरुपादुकांचे दर्शन आणि सदैव त्यांच्या गुरुचरणांशी रहाणे, हीच त्याच्या जीवनाची इतिश्री असते…!

अनंतकोटी ब्रह्मांडनायक इंदूरनिवासी, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (बाबा) आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांच्या चरणपादुकांचे आगमन सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ९ मार्च या दिवशी झाले. गुरुद्वयींच्या चरणपादुकांचा हा दर्शनसोहळा म्हणजे साधकांसाठी एक चैतन्यदायी आणि भावमय क्षणांची अनुभूतीच होती ! शंखध्वनी, तसेच जयघोषाच्या गजरात प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या पवित्र अन् मंगलमय चरणपादुका पायघड्यांवरून आश्रमाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आल्या. प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या चरणपादुकांचे विधीवत् पंचोपचार पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर भावपूर्ण आरती म्हणण्यात आली. प.पू. बाबांच्या भक्तगणांनी आश्रमातील सेवाकार्याची माहिती जाणून घेतली. प.पू. बाबांच्या चैतन्यदायी गाडीचेही सर्वांनी दर्शन घेतले.

प.पू. रामजीदादा यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या चरणपादुका पनवेल येथे आल्या होत्या.

साधकांनी अनुभवलेले भावमोती !

  • चरणपादुकांचे आश्रमात आगमन झाल्यावर आश्रमातील वातावरणातील चैतन्यात वाढ झाल्याचे सर्वांनी अनुभवले आणि पादुका गेल्यानंतरही बराच काळ सर्वजण त्या चैतन्यस्मृतीच्या डोहात डुंबत होते !
  • खरे तर काही कारणास्तव विलंब झाल्याने चरणपादुकांचे रात्री पावणेबाराला आश्रमात आगमन झाले; परंतु त्या वेळी ‘रात्र न वाटता पहाटच झाली आहे’, असे वाटत होते ! पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे त्यांचा उत्साह रात्रीही पुष्कळ ओसंडून वहात होता !

सोहळ्यास उपस्थित सद्गुरु आणि संत

सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. (सौ.) अश्विनी पवार, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. रमेश गडकरी, पू. उमेश शेणै, पू. शिवाजी वटकर आणि पू. रत्नमाला दळवी यांनी चरणपादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर आश्रमातील सर्व साधकांनी पादुकांचे दर्शन घेतले.

घटनाक्रम

१. सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांसह साधकांनी भक्तगणांचे स्वागत केले.

२. प.पू. बाबांच्या पादुका सनातनचे साधक श्री. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि प.पू. रामजीदादा यांच्या पादुका श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी हातात धरून आश्रमाच्या परिसरातून प्रवेशद्वारापर्यंत आणल्या.

३. सनातनचे साधक श्री. संदीप सकपाळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी दोन्ही चरणपादुकांना हार अर्पण केला आणि सुवासिनी साधिकांनी पादुकांचे औक्षण केले.

४. भक्तगणांच्या स्वागतासाठी भजनसदृश भावपंक्ती लिहिलेल्या आकर्षक स्वागतफलकाने भक्तांचे मन जिंकले !

५. पादुकापूजनानंतर ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, कोषाध्यक्ष आणि प.पू. रामजीदादा यांचे ज्येष्ठ जावई श्री. विजय मेंढे, विश्वस्त श्री. रवींद्र कर्पे अन् गिरीश दीक्षित यांचा सत्कार सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन आणि हार घालून केला.