China Pak Relations : (म्हणे) ‘चीन-पाक संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले !’ – चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग

चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केले पाकचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे अभिनंदन !

जिनपिंग आणि आसिफ अली झरदारी

बीजिंग (चीन) – चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे अभिनंदन केले. या वेळी जिनपिंग म्हणाले की, चीन-पाक यांच्यातील पोलादासारखी मैत्री ही इतिहासाची निवड आहे. जग वेगाने पालटांमधून जात आहे. हे पालट यापूर्वी कधीच पाहिले गेले नव्हते. अशा परिस्थितीत चीन-पाकिस्तान संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले आहे.

जिनपिंग पुढे म्हणाले की,

१. चीन आणि पाक हे चांगले शेजारी, चांगले मित्र, चांगले भागीदार आणि चांगले भाऊ आहेत. दोन्ही देशांमधील अतुलनीय मैत्री हा इतिहासाचा खजिना आहे.

२. चीन-पाकिस्तान संबंधांमधील दृढतेचा आम्ही पुष्कळ आदर करतो. ही मैत्री अधिक दृढ करण्यासाठी, विविध क्षेत्रात व्यावहारिक सहकार्य वाढवण्यासाठी, उभय देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी सशक्त करण्यासाठी आणि एका नवीन युगास आरंभ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत.

३. दोन्ही देशांनी वर्षाच्या अखेरीपासून उच्चस्तरीय चर्चा केल्या आहेत. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या बांधकामासह त्यांचे मूळ हितसंबंध आणि प्रमुख चिंता यांच्याशी संबंधित सूत्रांवर एकमेकांना पाठिंबा दिला आहे.

चीनमधील शिनजियांग प्रांत आणि पाकमधील बलुचिस्तान प्रांतात असलेल्या ग्वादर बंदराला जोडणार्‍या ‘सीपीईसी’ला भारताने नेहमीच आक्षेप घेतला आहे. याचे कारण असे की, तो प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे. आशियातील या ‘कुख्यात गुंडा’ला शह देण्यासाठी भारताने विविध स्तरांवर चालू असलेले प्रयत्न गतीने वाढवले पाहिजेत !