गेल्या वर्षीच्या तुलनेत मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट !

माले (मालदीव) – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ मार्चपर्यंत मालदीवला भेट देणार्‍या भारतियांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२३ पर्यंत ४१ सहस्र ५४ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. याउलट यावर्षी २ मार्चपर्यंत भारतीय पर्यटकांची संख्या २७ सहस्र २२४ इतकी नोंदवली गेली. अशा प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत ३३ टक्के, म्हणजेच १३ सहस्र ८३० ने घट झाली आहे.

सौजन्य Raj Express 

गेल्या वर्षी मालदीवतील निवडणुकीत मुइज्जू यांच्या ‘इंडिया आऊट’ या घोषणेनंतरही पर्यटकांच्या संख्येत भारतीय दुसर्‍या क्रमांकावर होते. यापूर्वी मालदीवमधील पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटक प्रथम क्रमांकावर होते. या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली, तेव्हा मुइज्जू सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘मोदी हे मालदीवमध्ये जाणार्‍या भारतीय पर्यटकांना भारतातच पर्यटन करण्यासाठी आकर्षित करत आहेत’, अशा आशयाची टीका केली. यामुळे कोट्यवधी भारतीय अप्रसन्न झाले. तेव्हापासून मालदीवला भेट देणार्‍या भारतियांच्या संख्येत मोठी घट झाली.