दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पनवेल येथे ६१ किलोचा गांजा जप्त !; जळगाव येथे संशयित आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या !…

पनवेल येथे ६१ किलोचा गांजा जप्त !

पनवेल – नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे चारचाकीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ सहस्र रुपये किमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चारचाकीसह गांजा असा २२ लाख ३४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संपादकीय भूमिका

सर्वच शहरांमध्ये अमली पदार्थांचा होणारा वाढता सुळसुळाट देशासाठी धोकादायक !


जळगाव येथे संशयित आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव – चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील मारवड येथील पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीतच गळफास घेतला. बकरी चोरीच्या नोंदवलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित घनश्याम कुमावत (वय ४९ वर्षे) याला अटक केली होती.


वर्धा येथील महिला उपजिल्हाधिकारी पोलिसांच्या कह्यात !

कोट्यवधी रुपयांचा अपहार करून पसार झाल्याचे प्रकरण !

वर्धा – शेतकर्‍यांच्या नावे बोगस बँक खाते चालू करून २ कोटी ६४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील तत्कालीन भू-संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या पसार झाल्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते.