Dibrugarh Jail Superintendent Arrested : आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक

खलिस्तानी समर्थक अमृतपाल याच्या कोठडीत भ्रमणभाषसह अन्य उपकरणे सापडल्याने कारवाई

दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास (चौकटीत)

दिब्रुगड (आसाम) – ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्यासह अनेक आतंकवादी आणि जिहादी आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. इतके धोकादायक लोक कारागृहात असूनही त्यांच्या कोठडीमधून अनेक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी तुरुंग अधीक्षक निपेन दास यांना अटक करण्यात आली आहे.

१७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी अमृतपालच्या कोठडीची तपासणी करण्यात आली होती. त्याच्याकडून भ्रमणभाष संच आणि गोपनीय (स्पाय) कॅमेरा पेन, कीपॅड फोन, पेन-ड्राइव्ह, ब्लूटूथ हेडफोन अशा अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. अन्वेषणानंतर कारागृह अधीक्षक निपेन दास यांना अटक करण्यात आली. आता या कोठड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !