गेल्या मासात ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. ‘काही विद्यार्थी मिळालेला वेळ अभ्यास करण्यात व्यतीत करण्याऐवजी अन्य गोष्टी करण्यात वाया घालवतात. ‘कॉपी’ करण्यामुळे कुणाचेही भले होत नाही’, या गोष्टीवर त्यांनी या सत्रात विशेष भर दिला. सध्या राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा चालू आहेत. परीक्षा केंद्रांत कॉपी करण्याच्या प्रथेवर आळा घालण्यासाठी पोलीस असतात, शासनाचे भरारी पथक असते. पर्यवेक्षक असतात. तरीही ‘कॉपी करणे’ याला भलताच ऊत आलेला असतो. कॉपी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणारे त्यांचे हितचिंतक (?) कॉपी करण्याच्या अन् ती पुरवण्याच्या विविध क्लृप्त्या शोधून काढतात. यंदाच्या बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने विविध ठिकाणच्या कॉपीबहाद्दरांची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. त्यावरून कॉपी पुरवण्याचा रोग राज्यात किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे, याची कल्पना येते.
शालेय जीवनात परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होण्याची सवय जडलेले महाभाग पुढील आयुष्यातही यश मिळवण्यासाठी वा आपल्या स्वार्थासाठी गैरमार्गाचा अवलंब करू पहातात. पौगंडावस्थेत असतांनाच कॉपी करण्याची सवय लागल्याने भविष्यात ‘असे करण्यात काही चुकीचे आहे’, असेही त्यांना कधी वाटत नाही. कॉपी केल्यामुळे आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ; मात्र पुढील व्यावहारिक जीवनात परीक्षेचे प्रसंग हे पदोपदी येणार आहेत, त्या वेळी आपली बुद्धीमत्ता आणि विवेक यांची कसोटी लागणार आहे, तेव्हा आपल्याला कोण साहाय्य करणार ? हे त्यांना लक्षात येत नाही. कॉपी करणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे आणि नेटाने अभ्यास केला आहे, त्यांच्यावर अन्याय करणे. कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे. परीक्षेचे पेपर सोडवण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करण्याची सवय विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात भ्रष्टाचाराने आणि गैरमार्गाने धन कमावण्याची सवय लावते. आज गल्लीपासून देहलीपर्यंत भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराला आवर घालणे, हे सरकारसमोरील आज मोठे आव्हान आहे. या भ्रष्टाचाराचे मूळ हे कॉपी करण्यात दडलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांविषयी जागरूकता येण्यासाठी शालेय जीवनात नीती आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.