|
मथुरा (उत्तरप्रदेश) – होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे. यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. मुसलमान पक्षाकडून येथील पूजेत सातत्याने व्यत्यय निर्माण केला जात आहे, त्यामुळे पूजा सुरळीत पार पडावी, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
१. ही विहीर हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असून ती भगवान कृष्णाचे पणतू वज्रनाभ यांनी बांधली होती. या विहिरीवर महिला होळीनंतर श्री शीतलामातेची पूजा करतात. याला ‘बासोदाची पूजा’ म्हणतात. ही पूजा पूर्वीपासून होत आहे; मात्र जेव्हापासून हिंदूंनी श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण आणि इतर मागण्या चालू केल्या, तेव्हापासून मुसलमानांकडून या पूजेत व्यत्यय आणला जात आहे. आता ही पूजा करण्यासाठी प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. गेल्या वर्षीही असेच घडले होते.
२. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. शाही इदगाहच्या मशिदीतील विहिरीची हिंदू पूर्वीपासून पूजा करत आहेत; मात्र आता मुसलमान त्यात व्यत्यय आणत आहेत.
३. महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या विहिरीची पूजा करण्यावर कोणतीही बंदी नसतांना मुसलमान विरोध करत आहेत. येथे हिंदू त्यांच्या मुलांचे मुंडण करून घेतात. हिंदूंना येथे नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होऊ शकते. या दिवशी शाही ईदगाह-कृष्णजन्मभूमी खटल्याचीही सुनावणी होणार आहे.