फोंडा (गोवा) येथील कु. स्मितल भुजले यांनी काढलेली शिवोपासनेच्या संदर्भातील भक्तीपूर्ण चित्रे आणि त्यांचा भावार्थ !

‘कला हे देवाने दिलेले एक वरदान आहे ! मग ते चित्र असो, नृत्य, गायन किंवा इतर अन्य कला असो. सर्व कलांचा उद्देश ईश्वरप्राप्ती असल्याने त्या कलांच्या माध्यमातून आपल्याला देवाच्या जवळ जाता येते. देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे. मला चित्रांच्या माध्यमातून माझ्या मनातील देवाविषयीचा भाव व्यक्त करायला आवडतो आणि त्याप्रमाणे मला चित्रे सुचतात. मी भावजागृतीचे प्रयत्न करत असतांना मला जे दिसते, जे सुचते, ते मी काढते. त्यातून मला पुष्कळ समाधान आणि आनंद मिळतो, जो अन्य कशात मिळत नाही ! मी ही सर्व चित्रे आणि लिखाण गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. माझे यांत काही नाही. हे चित्र पाहून जर कुणाची भावजागृती झाली किंवा ‘ते देवाच्या जवळ गेले आहेत’, असे त्यांना वाटले, तर ते माझ्यासाठी पुष्कळ आनंददायी असेल; कारण याचा मूळ उद्देश ‘या चित्रांतून आपले आणि देवाचे नाते लक्षात यावे’, हाच आहे !’

– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा. (९.१.२०२३)     

कु. स्मितल भुजले

ब्राह्ममुहुर्ताच्या वेळचे डमरू वादन !

चित्राचे विवरण

ब्राह्ममुहुर्तावर साधिका एका शिवमंदिरात असलेला डमरू वाजवत आहे आणि ती तिच्या देवासमवेत एकांत अनुभवत आहे. शिवमंदिरात वेगळ्या प्रकारची शांतता असते. ती शांतता अनुभवतांना असे वाटते, ‘देव आपल्या भोवती आहे.’ अशीच शांतता ती साधिका अनुभवत आहे.

– कु. स्मितल भुजले


तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले !

चित्राचे विवरण

‘हे चित्र मी कला विभागातील माझी सहसाधिका सौ. आरती पुराणिक यांच्यासाठी काढले. ताई मला एकदा तिला पडलेल्या स्वप्नाविषयी सांगत असतांना मला हे चित्र सूक्ष्मातून दिसले होते. हे चित्र मी तिला भेट दिले. या चित्रात साधिका नामजप करत आहे. नामजप करतांना ती त्यात इतकी मग्न झाली आहे की, ‘महादेव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिच्या मागे उभे राहिले आहेत’, हे तिलाही ठाऊक नाही. ‘तिने नेसलेल्या साडीच्या पदरातून पांढरी फुले महादेवांच्या चरणांपाशी जात आहेत’, हे तिने केलेला नामजप देवापर्यंत पोचल्याचे प्रतीक आहे.’- कु. स्मितल भुजले


१. शिवोपासनेच्या संदर्भातील चित्रांविषयीच्या लिखाणाची प्रेरणा !

‘११.९.२०२१ या दिवशी पू. उमाक्का (सनातन संस्थेच्या ७० व्या [समष्टी] संत पू. (सौ.) उमा रवीचंद्रन्) यांचा मला भ्रमणभाष आला. त्यांनी मी काढलेले शिवाचे चित्र रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. मयुरी आगवणे हिच्या ‘व्हॉट्सॲप प्रोफाईल’ वर पाहिले. त्यांना इतर चित्रेही पहायची होती; म्हणून कु. मयुरीने सर्व चित्रे त्यांना बघायला पाठवली. त्यानंतर त्यांविषयी चर्चा करण्यासाठी पू. उमाक्कांनी मला संपर्क केला. त्यांनी मला ‘सर्व चित्रांविषयी लिखाण केले आहे ना ?’ असे विचारल्यावर मी त्यांना चित्रांविषयी लिहून न देण्याचे कारण सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘देवाने सर्व चित्रे सुचवलेली असतात. तेव्हा त्यामागे देवाचा कार्यकारणभाव असतो. त्यामुळे आपण देवाला सर्व अर्पण केले पाहिजे.’’

पू. उमाक्का यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार हे लिहून देत आहे. ही सर्व चित्रे काढणे आणि लिखाण करणे गुरुदेवांमुळे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे) शक्य झाले आहे. माझ्यात एवढी क्षमता नाही की, मला हे जमू शकेल ! पू. उमाक्का, गुरुमाऊली आणि महादेव यांच्या पावन चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

२. महादेवाशी संबंधित चित्रे काढण्याचा आरंभ आणि कारण !

वर्ष २००४ मध्ये आम्ही मुंबईला रहात असतांना आमच्या घरी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आले. माझ्या आत्याने कर्नाटकहून आमच्याकडे साप्ताहिकांच्या गठ्ठ्याचे ‘पार्सल’ पाठवले होते. साप्ताहिके घरी आल्यापासून मला स्वप्न पडण्यास आरंभ झाला. स्वप्नात देव दिसणे, अनेक प्रकारच्या शिवपिंडी दिसणे, महादेवाची मंदिरे, शुभ चिन्हे, दूध, भस्म, पांढरी फुले, पाणी, पर्वतराजी, वाराणसी येथील घाट, गंगा नदी इत्यादी गोष्टी दिसू लागल्या. त्यानंतर काही वर्षांनी (वर्ष २००६ नंतर) माझी आई (श्रीमती अनुराधा भुजले) नामजप आणि सेवा करू लागली. तेव्हा ती मला सतत नामजप करायला सांगायची. मी तेव्हा कलेचे शिक्षण घेत होते. मी वर्ष २०१५ पर्यंत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केला. वर्ष २०१४ आणि वर्ष २०१५ या काळात कृष्णाचा नामजप करतांना मला काही वेळा महादेवाचे दर्शन झाले. त्या काळात मला स्वप्नांत पुष्कळ प्रमाणात शिवपिंडी दिसू लागल्या. गुरुदेवही माझ्या स्वप्नात यायचे. मला शिवाची विविध प्राचीन मंदिरे, विविध प्रकारच्या आणि रंगांच्या शिवपिंडी, काही ज्योतिर्लिंगे, शिवाची उपासना करणारी माणसे अन् पांढरी वस्त्रे परिधान केलेले पुजारी इत्यादी सतत दिसायचे. मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदा आले. तेव्हा एका सत्संगात मी परात्पर गुरुदेवांना विचारले, ‘‘मी कृष्णाची उपासना केली, तरी मला महादेवाचे दर्शन का होत आहे ? मी शिवाची उपासना करणे आवश्यक आहे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘गेल्या जन्मांची साधना आहे, जी तुझ्या अंतर्मनात आहे. तेच तुला दिसते आणि तेच तू कर !’’ त्यानंतर मला विविध प्रकारच्या शिवपिंडी आणि महादेवाशी संबंधित चित्रे काढायची इच्छा निर्माण झाली. ती चित्रे काढण्यातून पुष्कळ आनंद मिळू लागला. अजूनही मला पुष्कळ चित्रे सुचतात; पण वेळेअभावी आणि सेवेची तातडी असल्यामुळे मला चित्रे काढायला जमत नाहीत; मात्र मला वाटते, ‘कधीतरी मला माझ्या मनात असलेली चित्रे काढायला वेळ मिळेल.’ येथे दिलेल्या चित्रांतील काही चित्रे विविध प्रसंगांत, सेवा करतांना, नामजप करतांना मला सुचली आणि दिसली आहेत अन् काही मी स्वप्नांत पाहिली आहेत.

३. चित्रातील साधिकेच्या डोळ्यांत अश्रू असण्याचे कारण !

काही साधकांनी ही चित्रे पाहिली. तेव्हा काही साधकांनी मला विचारले, ‘‘चित्रातील मुलगी नेहमी रडत का असते ? जर ती देवाला भेटली आहे, तर ती आनंदी आणि हसत असायला हवी.’’ याचे उत्तर असे आहे, ‘ती रडत नसून तिचा भाव जागृत झाला आहे. भाव जागृत होतो. तेव्हा डोळ्यांतून अश्रू येतात. तो आपल्याला शब्दांतून व्यक्त करता येत नाही. तो आनंद केवळ आपल्याला अनुभवता येतो. तुम्हालाही कधी देवाची किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आठवण येते, तेव्हा डोळ्यांत अश्रू येतात ना ? मन आनंदाने भरून जाते ना ? देवाची आठवण येणे, म्हणजे आपल्या आयुष्यात देवाच्या अस्तित्वाची जाणीव होणे. ‘देवाविना या जगात काहीच सत्य नाही. तो एकटाच आहे, इतर काही नाही. आपले जे काही नाते आहे, ते केवळ देवासमवेत आहे’, हे या जाणिवेमुळे लक्षात येते. आपण साधक भाग्यवान आहोत की, देवाप्रती भावभक्ती आणि त्याच्याविषयी वाटणारे प्रेम, हे गुरुदेवांमुळे आपल्याला समजले. आपण व्यवहारात असतो आणि आपल्या आयुष्यात गुरुदेव नसते, तर आपल्याला देवाचे अस्तित्व कधी अनुभवता आले असते का ?’ हे सुंदर जग अनुभवायला दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !

४. लिखाण करतांना अनेक अडथळे येऊनही महादेवाच्या कृपेने ते पूर्ण होणे

हे लिखाण करायला मला पुष्कळ वेळ लागला; कारण यात मधेमधे पुष्कळ अडथळे आले. मी लिखाण करायला बसले की, काहीच सुचायचे नाही. मी याआधीही लिखाण करायला अनेक वेळा भ्रमणसंगणक उघडला आणि तसाच बंद करून ठेवून दिला; पण ‘हे पूर्ण करायचेच आहे’, असा मी निश्चय केला. ‘महादेवाच्या कृपेमुळे हे लिखाण सोमवारीच पूर्ण झाले’, याचा मला आनंद होत आहे.’

– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा. (९.१.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक