रुद्राक्षाची वैशिष्ट्ये !रुद्राक्ष नावाच्या झाडाला येणार्या फळाला ‘रुद्राक्ष’ असे म्हणतात. रुद्राक्ष म्हणजे, शिवशंकराचा तिसरा डोळा होय. ‘रूद्र + अक्ष’ यांपासून हा शब्द बनला आहे. त्याला शिवभक्तांच्या दृष्टीने रुद्राक्षाचे पुष्कळ महत्त्व आहे. त्रिपुरासुर राक्षस माजला होता. त्याला मारण्यासाठी कालाग्नीरूद्राने ध्यान चालू केले. ते करण्यापूर्वी त्याने स्वत:चे डोळे मिटून घेतले. त्या डोळ्यांतून पृथ्वीवर अश्रू पडले. त्या अश्रूंच्या थेंबांमधून रुद्राक्षाची झाडे उगवली आणि त्यांना फळे आली. पांढरे, तांबडे, पिवळे आणि काळे अशा ४ रंगांचे रुद्राक्ष असतात. अलाहाबादी मोठा आवळा ते अगदी लहान बोर असे त्यांचे आकार असतात. खरबुजाला जशा बाहेरून खापाच्या रेषा असतात, तशा रेषा रुद्राक्षालाही असतात. त्या खापांच्या रेषांना मुख म्हणतात. १ ते ४४ पर्यंत अशी मुखे रुद्राक्षास असतात. यातील प्रत्येक रुद्राक्षास स्वतंत्र नाव असून तो वेगवेगळ्या देवतांना अधिक प्रिय आहे.’ – श्री स्वामी समर्थ (साभार : श्री त्र्यंबकेश्वर विशेषांक १९९६) |
‘रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या नेत्रांतून अश्रूबिंदू भूमीवर पडल्यामुळे झाली. असे म्हटले जाते की, भगवान शंकरांनीच हे वृक्ष हिमालयात, गंगा-यमुनेच्या सखल प्रदेशात, सह्याद्रीत आणि लंकेमध्ये लावले. दुर्भाग्याला सद्भाग्यात परावर्तित करण्याची अमोघ शक्ती रुद्राक्षात आहे. ‘अशक्य ते शक्य’ आणि ‘असाध्य ते साध्य’ करण्याचे अद्भुत सामर्थ्यही रुद्राक्षात आहे. अस्सल रुद्राक्षाची पारख तो पाण्यात टाकून करतात. अस्सल रुद्राक्ष पाण्यात टाकल्यावर लगेच बुडतो. ‘रुद्राक्ष बालोपनिषदा’त सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या कसोटीच्या दगडावर रुद्राक्ष घासून पाहिल्यास सुवर्ण रेषेसारखीच त्याची रेखा उमटते, तो रुद्राक्ष उत्कृष्ट समजला जातो. रुद्राक्षाचे प्रकार आणि त्यातून होणारे लाभ पुढे दिले आहेत.
१. एकमुखी : एकमुखी रुद्राक्ष हा साक्षात शंभू महादेवाचे स्वरूप मानला जातो. तो धारण केल्यास महादेवाचा साक्षात्कार होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात.
२. दोनमुखी : २ मुखी रुद्राक्ष हा शिव आणि शक्ती यांचे प्रतीक आहे. तो धारण केल्यास ऐश्वर्य आणि सुख यांची प्राप्ती होते.
३. तीनमुखी : हा रुद्राक्ष अग्नीरूपी मानला जातो. याच्या प्रभावाने धारक अग्नीसारखा तेजस्वी होतो. हा रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यास सुख, विद्या आणि धन या गोष्टी प्राप्त होतात.
४. चारमुखी रुद्राक्ष : चारमुखी रुद्राक्ष हा ब्रह्मदेवस्वरूप मानला जातो. हा रुद्राक्ष धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारा आहे. हा गळ्यात धारण करावा.
५. पंचमुखी : हा रुद्राक्ष गायत्रीरूप आणि ‘कालाग्नीरूप’ मानतात. हा रुद्राक्ष संकटांचा नाश करणारा, मनोवांच्छित फलांची प्राप्ती करून देणारा, तसेच धारकास सर्व प्रकारचे भोग आणि मुक्ती देणारा आहे. हा गळ्यात धारण करावा.
६. सहामुखी : हा रुद्राक्ष ‘शिवपुत्र षडानन’ स्वरूप मानला जातो. हा धारण करणार्यावर लक्ष्मी आणि सरस्वती यांची कृपा प्राप्त होते. घरात अन्नपूर्णेचा वास, सुख, शांती, समाधान आणि विद्याप्राप्ती अशी फळे मिळतात. हा विद्यार्थ्यांनी अवश्य धारण करावा. हा केवळ उजव्या बाहूवरच धारण करावा.
७. सातमुखी : हा रुद्राक्ष साक्षात् विष्णुरूप मानला जातो. हा धारण करणार्यावर सप्तमातृका कृपा करतात. धारकाला आरोग्य, सुख, शांती आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी हा गळ्यात अवश्य धारण करावा.
८. आठमुखी : हा रुद्राक्ष गणेशस्वरूप मानला जातो. ‘यामध्ये अष्टवसु वास करतात’, असे मानले जाते. हा धारण करणार्यास दीर्घायुष्य, सर्व गुणांची, तसेच ज्ञानाची प्राप्ती गणेश कृपेने होते. हा गळ्यात धारण करावा.
९. नऊमुखी : हा रुद्राक्ष ‘भैरवस्वरूप’ मानला जातो. यात ९ शक्ती वास करतात. हा रुद्राक्ष व्यवसाय करणार्यांना अत्यंत लाभदायक आहे. धारकास मृत्यूचे भय रहात नाही. हा डाव्या बाहूवर धारण करावा.
१०. दशमुखी : हा रुद्राक्ष ‘जनार्दन’ म्हणजे विष्णुरूप मानला जातो. इंद्र, वरूण, यम, कुबेर, ईश, निऋती, वायु, अग्नी, ब्रह्म आणि शेष या रुद्राक्षात वास करतात. हा धारण केल्यामुळे भूत, प्रेतबाधा आणि ग्रहपीडा नष्ट होतात. सर्पभय नष्ट होते आणि दीर्घकालीन आजार नष्ट होतात. हा गळ्यात धारण करावा.
११. अकरामुखी : हा रूद्रस्वरूप मानला जातो. हा अत्यंत पवित्र, शक्तीशाली मानला जातो. हा धारकाला नेहमी सुखप्राप्ती आणि विजय मिळवून देतो. हा देवघरात पूजेस ठेवावा किंवा गळ्यात धारण करावा.
१२. बारामुखी : हा आदित्यस्वरूप मानतात. त्यामुळे हा धारण करणार्याच्या व्याधी नष्ट होऊन उत्तम आरोग्य प्राप्ती होते. दारिद्र्य नष्ट होते. हा कानात किंवा गळ्यात धारण करावा.
१३. तेरामुखी : तेरामुखी रुद्राक्ष हा इंद्रस्वरूप मानला जातो. हा धारण केल्यामुळे यशप्राप्ती आणि कामनांची सिद्धी होते. संतान प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष गळ्यात अवश्य धारण करावा.
१४. चौदामुखी : हा मारुति किंवा हनुमान स्वरूप मानतात. मारुति हा शंकराचाच अवतार मानला जातो. हा धारण केल्यामुळे वंशवृद्धी होते, तसेच पितृदोष, घराण्याचा शाप, कुलदेवतेची अवकृपा आणि वेडाचे झटके इत्यादी दूर करण्यासाठी हा रुद्राक्ष धारण करतात. धारकाला हा भाग्योदय आणि जीवनात योग्य दिशा मिळवून देतो. हा नित्य पूजेत किंवा गळ्यात धारण करावा.
१५. पंधरामुखी (गौरीशंकर) : हा शंकर आणि पार्वती स्वरूप मानला जातो. हा रुद्राक्ष मिळणे अत्यंत भाग्यकारक मानले जाते. सर्व सुखांची प्राप्ती हा रुद्राक्ष करून देतो. हा देवघरात नित्यपूजेसाठी किंवा तिजोरीत ठेवावा.
१६. सोळामुखी (त्रिगुणी) : हा गौरी-गणेश-शंकर रूपी मानतात. हा गौरीशंकरासारखेच फळ देतो. हा धैर्यवृद्धी, सुकीर्ती आणि यशप्राप्ती देतो.
रुद्राक्षात सर्व देवतांचा वास असल्यामुळे तो परम पवित्र, मंगलकारक आणि पूजनीय आहे. तो धारण करावयाचा, पूजेत ठेवायचा किंवा त्याची माळ करायची असेल, तर शुभमुहुर्तावर विधीपूर्वक त्याची पूजा करावी आणि जप करून मग रुद्राक्ष धारण करावा.’
(रुद्राक्ष बालोपनिषद)
– नयना जोशी (साभार : द्वैमासिक, ‘गुरुवंदना’ मार्च-एप्रिल २०१०)