मला काय हवे आहे ?

काही दिवसांपूर्वी मी आयुर्वेदाच्या वैद्यांकडे शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्याकडे शारीरिक आजारांसमवेत अन्य वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेले रुग्ण पाहिले. त्या वेळी त्या रुग्णांच्या समस्या, अडचणी, त्यांची दिनचर्या आणि आजार हे ऐकल्यानंतर ‘आपल्याला जीवनात काय हवे आहे ?’, याचा विसर पडत चालला आहे, असे प्रकर्षाने जाणवले. सध्या तरुण जोडप्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही मुले न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आयुर्वेदाच्या वैद्यांकडेही अशी काही जोडपी आली होती. त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांनुसारही मुले होण्याच्या दृष्टीने त्यांच्यात काही दोष नव्हता; परंतु त्यांची अन्य तपासणी केल्यावर असे लक्षात आले की, तरुण वयात आम्लपित्ताचा त्रास पुष्कळ प्रमाणात असणे, दिवसभर पुष्कळ ताण असणे, अशी लक्षणे त्यांच्यात होती. सर्वांची दिनचर्या सकाळी लवकर उठून नोकरीसाठी जायचे, नोकरीचे ठिकाण घरापासून पुष्कळ लांब असल्यामुळे एकदा घर सोडल्यानंतर पुन्हा घरी १२ ते १४ घंट्यांनंतरच परतायचे, दिवसभर वातानुकूलित खोलीत काम करायचे, कामाचा प्रचंड ताण, खाण्याच्या वेळा अनियमित, कार्यालयातील कामाचा वाढत्या व्यापामुळे मल-मूत्र विसर्जनासाठीही वेळेत जाता येत नाही, अशा विविध समस्या त्यांना होत्या.

आयुर्वेदानुसार ही सर्व दिनचर्या पाहिल्यास आपणच अनेक आजारांना स्वतःहून निमंत्रण देत आहोत, अशी स्थिती आहे. प्रत्येक जण ‘पैसे कमावल्यावर आनंद मिळणार’, या विचाराने नोकरीच्या मागे धावतो. हे करतांना भगवंताने दिलेल्या अमूल्य शरिराची काळजी कशी घ्यायला हवी, याचा विसर पडतो. शरीर आणि मन यांची हेळसांड झाल्यानंतर निर्माण होणार्‍या समस्यांना सामोरे जातांना पुष्कळ संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष करण्यासाठी जी ऊर्जा जाते, ती आपल्याला मोजताच येत नाही. अशा स्थितीत जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपाययोजना काढण्यासाठी वैद्यांकडे जातो, त्या वेळी त्या वैद्यांनाही प्रश्न पडतो, ‘या रुग्णाला कसे साहाय्य करायचे ?’ आयुर्वेदानुसार उपचार करतांना ‘हेतू’, म्हणजे ‘रोगाचे कारण दूर करणे’, ही प्रधान चिकित्सा असते. अशा प्रकारची दिनचर्या असणार्‍यांचा ‘हेतू’ पालट करायचा, तर ते शक्य नाही, असेच दिसते. रुग्णालाही याचा ताळमेळ घालता येत नाही.

एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. जेव्हा शरीर काम करत नाही, तेव्हा पैसा आणि अन्य गोष्टींसह सर्व असूनही ‘आपल्याकडे काही नाही’, या स्थितीला आपण पोचतो. त्यामुळे प्रत्येकाने ‘मला जीवनात नक्की काय हवे आहे ? कशाला प्राधान्य द्यायचे आहे ?’, याचा सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी उपयुक्त सल्लाही घ्यायला हवा !

– वैद्या ((कु.) सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.