तेहरान (इराण) – भारताची पश्चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही. तस्करी करणार्या नौकांचा मुख्य सूत्रधार ओळखणे, हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. या नौकांमधून अटक करण्यात आलेल्या लोकांना नौकांतील माल कुणाचा आहे किंवा त्यांना पैसे देणारे लोक कोण आहेत, याची माहिती नसते. अशा परिस्थितीत अटक आणि चौकशी यातून फारसा काही सुगावाही लागत नाही.
१. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अरबी समुद्रात गुजरातच्या किनार्याजवळ एक नौका पकडली आणि पाच पाकिस्तानी संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून तीन सहस्र किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त केले. अरबी समुद्रात अशा प्रत्येक नौकेला थांबवून शोध घेणे अशक्य आहे. भारताचा पश्चिम किनारा हा उत्तरेला सुरत (गुजरात) येथपासून दक्षिणेला कन्याकुमारी (तामिळनाडू) येथपर्यंत म्हणजे अनुमाने १ सहस्र ५०० किमी पसरलेला आहे. तस्कर पाकिस्तानी आणि इराणच्या किनारपट्टीवरून भारतात माल पोचवण्याचे काम करतात.
२. तस्करीसाठी वापरल्या जाणार्या नौका साधारणतः ५०-७० फूट लांब, १५-२० फूट रुंद आणि १०-१२ फूट उंच असतात. त्यांचे वजन १ सहस्र ५०० टन असते आणि त्यावर १५-२० माणसे असू शकतात. हे आतंकवादी गट इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून शस्त्रे अन् अमली पदार्थ खरेदी करतात आणि अरबी समुद्र अन् हिंदी महासागराच्या बाजूच्या देशांना पुरवतात.
३. ‘संडे गार्डियन’च्या अहवालात असे म्हटले आहे की, वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटात वापरलेला दारूगोळा आणि ३ सहस्र किलो ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटके पाकिस्तानातून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी आणि दिघी या घाटांतून मुंबईत आणण्यात आली होती.
४. इराणमधील चाबहार बंदर परिसरात अनेक सशस्त्र गट कार्यरत आहेत, जे पाकिस्तानच्या संगनमताने बेकायदेशीर कारवाया करतात. असाच एक गट जैशुल-अदल याने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण केल्याचा संशय आहे. जाधव यांना मार्च २०१६ मध्ये चाबहार येथून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कह्यात देण्यात आले होते.
५. यावर्षी ११ जानेवारी या दिवशी अमेरिकी नौदलाने अरबी समुद्रात सोमालियाच्या किनार्याजवळ एक छोटी नौका अडवली. या बोटीत अमेरिकी सैनिकांना इराणमध्ये बनवलेली शस्त्रे सापडली. या कारवाईत बोटीतून १४ जणांना अटक करण्यात आली. या सर्वांकडे पाकिस्तानी ओळखपत्र होते. प्राथमिक अन्वेषणात आरोपींनी ते पाकिस्तानातून आल्याची स्वीकृती दिली; मात्र नंतर त्यांनी सांगितले की, ते इराणच्या चाबहार बंदरातून आले होते. अमेरिकी अन्वेषण यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, बोटीवर सापडलेले क्षेपणास्त्राचे भाग हुती बंडखोरांसाठी होते आणि ते इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने पाठवले होते.