चीनसमवेतच्या संरक्षण करारामुळे मालदीवची होणार मोठी हानी ! – पाकिस्तानी तज्ञ

माले (मालदीव) – मालदीवचे नवे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी चीनसोबत संरक्षण करार केला आहे. चीनसोबत केलेल्या करारामुळे मालदीवची मोठी हानी होणार आहे, असे मत पाकिस्तानी संरक्षण तज्ञ डॉ. कमर चीमा यांनी त्यांच्या एका ‘व्लॉग’मध्ये याविषयी सांगितले आहे. डॉ. चिमा म्हणाले की, मालदीव त्याच्या जवळच्या देशाचा म्हणजेच भारताचा विश्‍वास अल्प करत आहे.

डॉ. कमर चीमा पुढे म्हणाले की, मुइज्जू यांचा भारतविरोधी चेहरा पहिल्यांदाच समोर आलेला नाही. राष्ट्रपती झाल्यापासून मुइज्जू सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. सत्तेवर आल्यानंतर मुइज्जू यांनी सर्वप्रथम तेथे साहाय्य आणि प्रशिक्षण यांसाठी उपस्थित भारतीय सैनिकांना परत पाठवण्याविषयी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, विदेशी सैनिकांना देशात ठेवून मालदीवला कोणत्याही छावणीचे रूप द्यायचे नाही; मात्र आता चीनसोबत झालेल्या संरक्षण करारानंतर मुइज्जू यांनी चीनच्या सूचनांचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताला घेरण्याची चीनची चाल !

पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने पुढे म्हटले की, चीनला मालदीवमध्ये प्रवेश मिळाला की, तो तिथे बसून भारताची माहिती गोळा करू शकतो. दुसरीकडे अरबी समुद्रात पाकिस्तान आहे, ज्याच्याशी चीनचे चांगले संबंध आहेत. यासोबतच हिंद महासागरातही त्याची उपस्थिती असेल, ज्यामुळे तो ‘वेस्टर्न ब्लॉक’वरही (मोझॅम्बिक, सेयचेल्स, माडागास्कर, सोमालिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांवरही) लक्ष ठेवण्यास सक्षम बनेल.

भारतासमवेतच्या तणावानंतर मालदीवच्या पर्यटन उद्योगाला फटका !

डॉ. चीमा म्हणतात की, मालदीवच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योगाचा वाटा एक तृतीयांश आहे, ज्यामध्ये रशियन आणि भारतीय पर्यटक बहुसंख्य आहेत. भारतासोबतच्या तणावानंतर तेथील पर्यटन उद्योगाला फटका बसेल. मात्र, आता चीनने आपली पर्यटन उत्पादने मालदीवमध्ये पाठवून आपण मालदीवसमवेत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारताने आता लक्षद्वीपला पर्यटन केंद्र म्हणून सिद्ध करण्याची योजना आखली आहे.

मालदीव चीनच्या जाळ्यात !

मुइज्जू यांना वाटते की, चीन आणि भारत यांच्यात तणाव आहे. अशा परिस्थितीत ते भारतविरोधी भूमिका घेऊन चीनकडून त्याच्या देशासाठी निधी मिळवू शकतात; पण कदाचित त्यांना चीनचे डावपेच आणि कर्जाच्या सापळ्यात अडकल्यानंतर तो आपली पकड कशी घट्ट करतो, हे ठाऊक नसावे. श्रीलंकेचे उदाहरण मुइज्जू यांच्यासमोर आहे, जिथे प्रारंभीच्या काळात चीन श्रीलंकेच्या पुष्कळ जवळ आला होता; पण जेव्हा तेथील अर्थव्यवस्था डबघाईला आली, तेव्हा चीन नाही, तर शेजारी भारतच साहाय्याला आला, असेही डॉ. चीमा म्हणाले.