Pakistani Public Reaction : (म्हणे) ‘काफिरां’पुढे आम्ही झुकणार नाही !’ – पाकिस्तानी जनता

पाकिस्तानी जनतेचे भारताविरोधात विषवमन

(काफीर म्हणजे इस्लामविरोधी)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – शाहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानात सत्ता स्थापित केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावर पाकिस्तानी जनतेशी तेथील काही पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांच्या मनात खदखदत असलेला भारतद्वेष बाहेर पडला.

नवाझ सरकार पायउतार व्हायला पंतप्रधान मोदी उत्तरदायी !

आफताब अहमद नावाच्या व्यक्तीने संभाषणात सांगितले की, भारत हा पाकिस्तानच्या विरोधात काम करतो. नवाझ शरीफ यांचे सरकार पूर्वी पुष्कळ चांगले काम करत होते; पण त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे अचानक झालेले आगमन धक्कादायक होते. शरीफही हे जनतेला नीट समजावून सांगू शकले नाहीत. लोकांनी याला देशाविरुद्धचे षड्यंत्र मानले. नवाझ सरकार पायउतार व्हायला पंतप्रधान मोदी हेच उत्तरदायी आहेत.

सध्याचा सत्ताधारी पक्ष भारताकडे नेहमीच भीक मागत आला आहे !

रमिश नावाच्या व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) सरकार अमेरिका किंवा भारत यांच्याकडे नेहमीच भीक मागते. इम्रान खान यांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांची बाजू घेतली; पण आताच्या सत्ताधार्‍यांकडून आम्हाला कोणतीही आशा नाही.

सध्याचे सरकार देशाला विकून टाकतील !

अन्य एका व्यक्तीने म्हटले की, या वेळी या लोकांचे सरकार (शाहबाझ सरकार) देश विकण्याचा सौदा करील आणि सत्ताधारी देश विकून पळून जातील !

आम्हाला भारतासमवेत व्यापार नको !

महंमद सफदर नावाच्या व्यक्तीने सांगितले की, शत्रू देशाकडून कोणतीही चांगली बातमी येऊ शकत नाही. प्रत्येक देशाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहू शकणारा पंतप्रधान हवा. भारतासोबतच्या व्यापारात पाकिस्तानला कोणताही लाभ नाही. संपूर्ण जग भारतासमवेत जो व्यापार करत आहे, तो वेडेपणा आहे. आम्ही ‘काफिरां’पुढे झुकणार नाही. आम्हाला भारतासमवेत व्यापार नको आहे.

संपादकीय भूमिका

आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्‍या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !