Houthi Attack : हुती बंडखोरांचा अमेरिकी युद्धनौकांवर आक्रमण केल्याचा दावा

नवी देहली – येमेनमधील इराण समर्थित हुती बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिकेच्या २ युद्धनौकांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांद्वारे लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हुतीचा प्रवक्ता याह्या सरिया याने प्रसारित केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. याविषयी अमेरिकेकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

१. इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यापासून हुती बंडखोर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय नौका मार्गांवर लाल समुद्र आणि एडनचे आखात येथे व्यावसायिक नौकांना लक्ष्य करत आहेत. या आक्रमणांमुळे अनेक व्यापारी आस्थापनांनी या जलमार्गाऐवजी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून त्यांच्या नौका पाठवण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे जगात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

२. अमेरिकेने त्याच्या मित्रराष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय जल मार्गावर पाळत ठेवली आहे; मात्र हुती बंडखोर अमेरिकी युद्धनौकांनाही लक्ष्य करत आहेत. अमेरिकेच्या युद्धनौकांनी पूर्वेकडील हुती बंडखोरांची अनेक आक्रमणे परतवून लावली आहेत.

३. भारतीय नौदलानेही अरबी समुद्र आणि एडनचे आखात येथे त्याच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत आणि अनेक व्यापारी नौकांना आक्रमणांंपासून वाचवले आहे; परंतु सर्व प्रयत्न करूनही आंतरराष्ट्रीय नौकानयन मार्गाची सुरक्षा सुनिश्‍चित केली जात नाही.