दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !; अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !…

विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !

मुंबई – रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !

शहापूर – येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी आश्रमशाळेत कामाठी म्हणून कार्यरत असलेल्या गणपत गवळी (वय ५७ वर्षे) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !


भ्रमणभाषच्या बॅटरीच्या स्फोटात १० वर्षीय मुलाचा मृत्यू !

जालना – भोकरदन तालुक्यातील कुंभारी गाव येथे प्रभारित करण्यासाठी लावलेल्या भ्रमणभाषच्या बॅटरीच्या स्फोटात समर्थ तायडे (वय १० वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. भ्रमणभाषच्या स्फोटात समर्थचा कान आणि हाताची बोटे यांना पुष्कळ मार लागला. त्याला रुग्णालयात भरती केले होते; पण वैद्यकीय अधिकार्‍यांनी पडताळून त्याला मृत घोषित केले.


प्रदूषणाच्या विरोधात उरण येथे राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने !

उरण – रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर उरण सामाजिक संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या धुळीमुळे दीर्घकाळ खोकला आणि श्वसनाचे त्रास होत आहेत.

यासाठी नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन याविरोधात कृतीशील का होत नाही ?


राजगुरुनगर येथील मंडल अधिकारी आणि तलाठी यांना लाच घेतांना अटक !

पुणे – सात-बारावर नोंद करण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राजगुरुनगर (तालुका खेड) मंडल अधिकारी सविता घुमटकर आणि तलाठी बबन लंघे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही घटना ३ मार्च या दिवशी दुपारी घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराने पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा !