‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्री निमित्त विशेष भक्तीसत्संग ऐकतांना मला पुष्कळ वर्षांपूर्वीची अनुभूती आठवली. ती पुढे दिली आहे.
१. लहानपणापासून धार्मिक सण-व्रते करण्याची आवड असणे
‘साधारण १९६२ – १९६३ या वर्षी मी नुकतीच ११ वी मॅट्रिक (पूर्वीचा अभ्यासक्रम) झाले होते. मला लहानपणापासून देवाची आवड होती. माझी देवावर पुष्कळ श्रद्धा होती. घरात धार्मिक वातावरण असल्याने आमच्या घरी सण-वार आणि व्रते पारंपरिक पद्धतीने केले जायचे. माझ्याकडून श्रद्धापूर्वक व्रत केले जायचे. ‘एकादशी, महाशिवरात्र, वैकुुंठ चतुर्दशी’, असे उपवास यथासांग व्हायचे.
२. स्वप्नात देवाने सोमवारचा उपवास करण्यास सांगणे
त्या वेळी मी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला असेन. एक दिवस पहाटे मला स्वप्न पडले. स्वप्नात निळे आकाश असून तिथे मला दोन डोळे क्षणभर दिसले आणि एक आवाज ऐकू आला, ‘तू सोमवारचा उपवास कर.’
३. ‘देवच माझ्याकडून उपवास करवून घेईल’, या श्रद्धेने उपवास करणे
सकाळी उठल्यावर मी आईला म्हणाले, ‘‘आई, मी सोमवारचा उपवास करणार आहे.’’ आई म्हणाली, ‘‘तू उपवास करू नकोस. तो कडक असतो. तू विसरू शकतेस; म्हणून करू नकोस.’’ तेव्हा ‘ज्या देवाने सांगितले, तोच माझ्याकडून उपवास करवून घेईल’, असे काहीसे मला वाटले.
४. काही वर्षांनी ‘पूजा करू नये’, असे वाटणे
सनातन संस्थेत येण्यापूर्वी वर्ष १९९०-१९९१ मध्ये मला पूजा करावीशी वाटेना. ‘केवळ विठ्ठलाची मूर्ती काचेच्या देवघरात ठेवावी आणि काही सण-वार अन् एकादशी या दिवशीच यथासांग पूजा करावी’, असे मला वाटत होते.
५. ‘पूजा आणि उपवास’ यांपेक्षा नामजपाला अधिक महत्त्व आहे’, हे सनातन संस्थेच्या सत्संगात सांगितल्यावर ‘मला पूजा करण्याचा कंटाळा का येत आहे’, याचे कारण समजणे
वर्ष १९९४ मध्ये गुरुदेवांच्या कृपेने मी सनातन संस्थेमध्ये आले. श्री. शिवाजीराव कुलकर्णी संभाजीनगरला आले. आजूबाजूच्या काही महिलांना घरी बोलावून त्यांनी सनातनचा सत्संग घेतला. त्यात त्यांनी सांगितले, ‘‘पूजा आणि उपवास यांपेक्षा नामजपाला अधिक महत्त्व आहे.’’ तेव्हा ‘मला पूजा करण्याचा कंटाळा का आला आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘नामजपाचा टप्पा आल्यावर असे होते’, असे त्यांनी सांगितले.
६. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास प्रारंभ केल्यावर उपवास सोडणे
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्या समवेत मी गोव्यात आले. तेव्हा आधुनिक वैद्य मराठेकाकांनी धामसे या त्यांच्या घरी मुक्कामासाठी नेले होते. जाता जाता त्यांनी मला श्रीमती डुंबरेआजी यांच्याकडे थोडा वेळ नेले होते. त्या दिवशी माझा सोमवारचा उपवास होता. त्या डुंबरेआजी मला म्हणाल्या, ‘‘मी तुमच्यासाठी फणसाचे काप करते.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘नको. माझा सोमवारचा उपवास आहे.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आता सनातन संस्थेमध्ये आल्यावर उपवास कुठे करता ?’’ मग त्यांनी मला फणसाचे काप खाऊ घातले. आता माझ्या लक्षात आले, ‘तेव्हा गुरुदेवांनीच मला स्वप्नात उपवास करायला सांगितला आणि आता त्यांनीच (साधिकेच्या माध्यमातून) त्यातून सोडवले.’ महाशिवरात्री निमित्त झालेल्या आजच्या भक्तीसत्संगात त्या स्वप्नाची पुष्कळ आठवण आली.
‘हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक, देवाधिदेवा, आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |