‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये आगाशे विद्यामंदिर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी – ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत खासगी शाळांच्या गटात येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.

या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, शिक्षक बंधू सुधीर शिंदे यांच्यासह सर्व अध्यापक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध स्पर्धांमधील यशस्वीता, शाळा आणि शाळा परिसर स्वच्छ, सुंदर बालोद्यान, संगणक शिक्षणाची सुविधा, सुसज्ज वाचनालय, प्रत्येक उपक्रमाची नियोजनपूर्वक आखणी, उत्तम पालक संपर्क, महावाचन उपक्रमातील शाळेचा सहभाग, स्वच्छता ‘मॉनिटर’ उपक्रमातील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, बँकिंग, उपयुक्त कार्यानुभव इत्यादी गोष्टींचा विचार मूल्यमापन समितीने केला. यामध्ये केंद्रात प्रथम निवड, त्यानंतर तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यातही शाळेने प्रथम क्रमांक मिळवत शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली.


याबद्दल अधिकारी वर्ग, पालक, संस्था सदस्य यांच्याकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारत शिक्षण मंडळाच्या सभेतही शाळेच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, कॅ. दिलीप भाटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, विजय वाघमारे, संस्था सदस्यांनी कृ.चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.