अटकेत असलेला शहरी नक्षलवादी प्रा. साईबाबा याची मुक्तता !

उच्च न्यायालयाने दिला निकाल !

शहरी नक्षलवादी प्रा. साईबाबा

मुंबई – नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले. साईबाबासह अन्य ५ जणांच्या मुक्ततेचा आदेशही या वेळी न्यायालयाने दिला. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी आणि पांडू पोरा नरोटे अशी अन्य शहरी नक्षलवाद्यांची नावे आहेत. यांतील नरोटे याचे निधन झाले आहे.

सौजन्य झी 24 तास 

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे; मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. पुढील निर्णयापर्यंत या सर्वांची प्रत्येकी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एस.ए. मेनेझेस यांच्या घटनापिठाच्या पुढे ही सुनावणी पार पडली.

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०१७ मध्ये साईबाबा आणि अन्य ५ जणांची गडचिरोली सत्र न्यायालयाकडून दोषनिश्‍चिती करण्यात आली होती. साईबाबा आणि अन्य आरोपी यांचा नक्षलवादी कारवायांशी संबंध असणे, तसेच त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. या सर्वांकडे नक्षली कारवाया भडकवण्यासाठी साहित्य सापडल्याचे सत्र न्यायालयाने मान्य केले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा याची निर्दोष मुक्तता केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रहित करून पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश दिला होता.