अमेरिका प्रथमच गाझाला साहाय्य करत विमानातून अन्नपदार्थ खाली टाकणार !
गाझा / वॉशिंग्टन – इस्रायली आक्रमणात ७ ओलीस मारले गेले, असा दावा हमासने १ मार्चच्या रात्री केला. यामुळे आतापर्यंत ७० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासचे म्हणणे आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी गाझामध्ये अनुमाने २५३ लोकांना ओलीस ठेवले होते. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत झालेल्या युद्धविरामात १०५ ओलिसांची सुटका करण्यात आली होती. उर्वरित ओलीस अजूनही हमासच्या कैदेतच आहेत.
अन्नाची पाकिटे गोळा करण्यासाठी पोचलेल्या पॅलिस्टिनींवर इस्रायली आक्रमण, ११२ ठार !
१ मार्च या दिवशी अन्न आदी साहाय्य सामग्री गोळा करण्यासाठी पोचलेल्या पॅलेस्टिनी लोकांवर इस्रायली सैन्याने गोळीबार केला, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले. यामध्ये ११२ पॅलेस्टिनी ठार झाले, तर ७६० जण घायाळ झाले आहेत. ही घटना अल् नबुलसी शहरातील आहे. या घटनेमुळे अमेरिकेने विमानाद्वारे अन्नाची पाकिटे खाली टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायल-हमास यांच्यात युद्ध चालू झाल्यापासून अमेरिका प्रथमच गाझाला साहाय्य करणार आहे.
गाझातील २२ लाख लोक उपासमारीच्या मार्गावर ! – संयुक्त राष्ट्रांचा दावा
काही दिवसांपूर्वी जॉर्डनने दक्षिण गाझामध्ये विमानातून साहाय्य सामग्री टाकली; परंतु ती पाकिटे समुद्रात पडली. पॅलेस्टिनी त्यांना उचलण्यासाठी समुद्रात धावले. काही लोक बोटीतून अन्न घेऊन जातांना दिसले. संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की, गाझातील २२ लाख लोक उपासमारीच्या मार्गावर आहेत. तेथील लोकांची एक महिन्याची भूक भागवण्यासाठी पुरेशा वस्तूंची व्यवस्था करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.