China Claim On LAC Situation : (म्हणे) ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती सामान्य !’ – चीन

  • चीनचे धूळफेक करणारे विधान !

  • चीनने डेपसांग-डेमचोक येथून त्याचे सैन्य माघारी घेण्याची भारताची मागणी फेटाळली होती !

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग

बीजिंग (चीन) – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासमवेतची स्थिती सामान्य आहे, असा दावा चीनने केला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्हणाले होते की, चीन सीमेवर गुंडगिरी करत आहे आणि भारतीय सैन्य त्याचा धैर्याने सामना करत आहे.

१. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग म्हणाले की, कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची २१ वी फेरी दोन्ही देशांमध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी झाली. ही चर्चा सकारात्मक झाली. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेविषयी एकमेकांच्या चिंता लक्षात घेऊन तोडगा काढण्याचे मान्य केले.

२. चीन असे जरी म्हणत असला, तरी या बैठकीत चीनने डेपसांग आणि डेमचोक येथील ट्रॅक जंक्शनवरून सैन्य मागे घेण्याची भारताची मागणी फेटाळली होती.

३. या संदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेच्या वृत्तात, दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

४. यावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, हे खोटे आहे. चीनसाठी दोन्ही देशांमधील सैनिकी संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्हाला आशा आहे की, भारत आणि चीन मतभेद दूर करण्यासाठी अन् परस्पर विश्‍वास वाढवण्यासाठी एकत्र काम करत रहातील.

संपादकीय भूमिका

‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारताचा केसाने गळा कापणार्‍या चीनवर कोण विश्‍वास ठेवणार ?