‘बंगाल राज्यातील संदेशखालीमधील अत्याचारप्रकरणी संघर्ष वाढत चालला आहे. संदेशखाली येथे महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने सर्व आरोप फेटाळले आहेत. आधी शाहजहान शेखच्या टोळीने अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) चमूवर केलेले आक्रमण आणि आता महिलांवरील अत्याचार यांमुळे बंगाल होरपळून निघत आहे; पण या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहजहान याला २८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली.
१. संदेशखालीमध्ये महिलांवरील अत्याचारप्रकरणी रणकंद !
संदेशखाली प्रकरणावरून बंगालमध्ये रणकंद माजले आहे. बंगालचे संपूर्ण राजकारण सध्या संदेशखालीभोवती फिरत आहे. तेथील काही महिलांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहेत. या प्रकरणाचे स्वतंत्रपणे अन्वेषण चालू आहे; मात्र अद्यापपर्यंत आरोपींविषयी कोणताही सुगावा लागलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि पोलीस यांच्यात चकमक चालू आहे. त्यामुळे संदेशखालीतील तणावामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. संपूर्ण परिसर जळत आहे. पीडित महिला न्यायाची मागणी करत असून संदेशखाली येथे पोलीस बंदोबस्त ठेवत आहेत. बंगालच्या कानाकोपर्यात भाजप रस्त्यावर उतरत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात संताप आहे. पीडित महिलांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. काही दिवसांपूर्वी बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी संदेशखाली येथे जाण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्यांना रोखले. यात लाठीमार होऊन मजुमदार घायाळ झाले. एक दिवस आधी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनाही संदेशखाली येथे जायचे होते; मात्र पोलीस भिंतीसारखे उभे होते. या वेळी अधिकारी यांचे समर्थक आणि पोलीस यांची झटापट झाली.
२. शाहजहान शेख आणि त्याचे सहकारी यांचे महिलांवर अनन्वित अत्याचार !
संदेशखाली हे कोलकाता येथून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. ते उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बशीरहाट उपविभागात येते. हा भाग बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. अल्पसंख्यांक आणि आदिवासी समाजातील बहुतांश लोक येथे रहातात. गेल्या काही दिवसांपासून येथील महिला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख आणि त्याचे सहकारी यांच्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा उघडत आहेत. संदेशखाली येथील पीडित महिलांनी स्वत: त्यांच्यावर बेतलले प्रसंग कथन केले आहेत. पीडित महिलांनी शाहजहान शेख आणि त्याचे समर्थक यांवर अत्याचार, लैंगिक छळ, भूमी बळकावणे असे गंभीर आरोप केले आहेत.
आरोप करणार्या एका महिलेने सांगितले की, तृणमूलचा नेता शाहजहान शेख याचे लोक गावात घरोघरी जाऊन तपासणी करतात. त्यांना घरात कोणतीही सुंदर महिला किंवा मुलगी दिसली, तर ते तिचे अपहरण करतात. ते तिला रात्रभर स्थानिक पक्षाच्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी ठेवायचे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दुसर्या दिवशी तिच्या घरासमोर आणून सोडायचे. याविषयीची माहिती मिळताच बंगालच्या राज्यपालांनी तातडीने या प्रकरणाची नोंद घेतली आणि ते स्वत: संदेशखाली येथे पोचले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी संदेशखालीमध्ये घडलेला प्रकार धक्कादायक असल्याचे सांगितले.
३. संदेशखालीतील अत्याचारांच्या विरोधात भाजप आक्रमक !
भाजपची ‘सत्यशोधक समिती’ संदेशखाली येथे जात असतांना बंगाल पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा संदर्भ देत त्यांना थांबवले. या वेळी भाजप नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. तेथे थांबल्यानंतर भाजप नेत्यांनी आरोप केला की, बंगाल पोलीस हे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसारखे वागत असून सरकार गुंडांना संरक्षण देत आहे. संदेशखाली येथे मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला आहे, हे पोलिसांनी त्यांना अडवून सिद्ध केले आहे.
भाजप याप्रकरणी बंगाल सरकारला घेरून निदर्शने करत आहे. १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पक्षाने बशीरहाट येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या वेळीही पोलीस आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. १३ फेब्रुवारी या दिवशी कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखाली येथील कलम
१४४ अंतर्गत घोषित केलेली संचारबंदी रहित केली. त्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने संदेशखाली येथे भेट दिली आणि पीडित महिलांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनीही या भागात भेट देऊन पीडित महिलांशी संवाद साधला. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी भाजपवर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. कुणाल घोष म्हणाले, ‘‘भाजपचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप परिसरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे.’’
४. मुख्य आरोपी शाहजहान शेख ५५ दिवस पसार !
गेल्या मासात बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्यातील अनुमाने १० सहस्र कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी शहाजहान शेख याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी ‘ईडी’चे पथक त्याच्या निवासस्थानी पोचले होते. तेव्हा त्याच्या गुंडांनी ‘ईडी’ अधिकार्यांवर आक्रमण केले होते. त्या वेळी जमावाने अधिकार्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. या आक्रमणात ‘ईडी’चे ३ अधिकारी घायाळ झाले आहेत. आतापर्यंत या प्रकरणातील ४ जणांना अटक करण्यात आली; मात्र मुख्य आरोपी शाहजहान शेख ५५ दिवस पसार होता.
– किशोर जोशी
(साभार : ‘आज तक’ वृत्तवाहिनी)