छत्रपती संभाजीनगर येथे प्रति शनिवारी स्वव्ययाने कार्यालयात स्वच्छता मोहीम !

जिल्हाधिकार्‍यांचे कर्मचारी आणि अधिकारी यांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर – जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत अस्वच्छता, पान, गुटखा खाऊन थुंकणे, धारिकांचे ढीग, बाहेरील परिसर अस्वच्छ आढळून आल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रति शनिवारी स्वव्ययाने कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. (प्रतिमास ५० सहस्रांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा हा बेशिस्तपणा आहे. स्वतःचे कार्यालय अस्वच्छ ठेवणे हे कर्मचारी आणि अधिकारी यांना लज्जास्पद ! – संपादक)

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांत जिल्ह्यातील सहस्रो नागरिक प्रतिदिन कामानिमित्त येतात. कार्यालयात स्वच्छता कशी आहे ? कामकाज कसे चालते ? धारिकांचे गठ्ठे पडून आहेत का ? आदींची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी अचानक पहाणी केली. जिथे अधिकारी, कर्मचारी बसतात तिथे आणि आसपासचा परिसर त्यांना अतिशय अस्वच्छ दिसून आला. पान खाऊन, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणे, बाहेरील अस्वच्छ परिसर पाहून स्वामी यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांची कानउघाडणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था योग्य नाही. वरिष्ठ अधिकारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावतात. तेव्हा अन्य अधिकारी आणि कर्मचारी बैठकीला विलंबाने येतात. १० जण बैठकीला विलंबाने येत असल्याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला. असा बेशिस्तपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी जिल्हाधिकारी स्वामी यांनी देऊन तसे परिपत्रकच त्यांनी लागू केले.