२४ वर्षांचे अश्‍विन रामास्वामी अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेची निवडणूक लढवणार !

अश्‍विन रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अश्‍विन रामास्वामी हे अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे सर्वांत अल्प वयाचे पहिले भारतीय-अमेरिकी बनले आहेत. रामास्वामी यांचे आई-वडील वर्ष १९९० मध्ये तामिळनाडू येथून अमेरिकेत आले. वर्ष २००० मध्ये जन्मलेले अश्‍विन हे ‘जनरेशन झी’ या पिढीतील आहेत. वर्ष १९९७ आणि २०१२ या कालावधीत जन्मलेल्या लोकांचा या पिढीत समावेश केला जातो.

रामास्वामी यांनी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, निवडणूक सुरक्षा, तंत्रज्ञान कायदा आणि धोरण संशोधन यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांचे पालकही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. जर रामास्वामी निवडणूक जिंकले, तर ते जॉर्जियातील पहिले ‘जनरेशन झी राज्य सिनेटर’ आणि संगणक विज्ञान अन् कायदा या दोन्ही पदव्या असलेले येथील पहिले लोकप्रतिनिधी असतील. एका प्रश्‍नाला उत्तर देतांना रामास्वामी म्हणाले,

१. मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या समुदायाची सेवा करण्यासाठी ‘जॉर्जिया स्टेट सिनेट’साठी निवडणूक लढवत आहे. प्रत्येकाला समान संधी मिळतील, हे मी सुनिश्‍चित करू शकतो.

२. माझी आई चेन्नई येथील असून वडील कोईम्बतूरचे आहेत. मी भारतीय आणि अमेरिकी संस्कृतीत वाढलो. मी हिंदु आहे. मला लहानपणापासून भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांच्यात पुष्कळ रस होता.

३. मी चिन्मय मिशन बालवाडीत जात होतो. तिथे मी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारख्या महाकाव्यांचे वाचन केले.