भारतसमर्थक असल्याची चर्चा !
जकार्ता – जगातील सर्वांत मोठा मुसलमान देश असलेल्या इंडोनेशियात नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाली आहे. तज्ञांच्या मते सुबियांतो सत्तेत आल्यानंतर भारतासमवेतचे इंडोनेशियाचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. सुबियांतो हे यापूर्वी देशाचे संरक्षणमंत्री राहिले आहेत. याआधी सुबियांतो यांनी फिलिपीन्सप्रमाणे भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुबियांतो यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली जाते.
सौजन्य AP Archive
सुबियांतो हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. ते भारताशी सशक्त संबंधांचे समर्थन करतात. भारत आणि इंडोनेशिया यांच्या सागरी सीमा एकमेकांना मिळतात. वर्ष २०२० मध्ये कोरोना संकटानंतरही सुबियांतो यांनी भारताला भेट दिली होती आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यांना भारतासमवेत संरक्षण संबंध दृढ करायचे होते. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र कराराचा समावेशही आहे.
सुबियांतो यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी तुलना का केली जाते ?
सुबियांतो इंडोनेशियातील शाळांमध्ये भारताची अत्यंत यशस्वी माध्यान्ह भोजन आणि दूध योजना राबवू शकतात. याचा उल्लेख सुबियांतो यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी अनेकदा केला होता. सुबियांतो यांचे भाऊ हाशिम हे देशातील मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांचे भारतात अनेक व्यावसायिक संबंध आहेत. सुबियांतो आशियामध्ये भारताचा समावेश असलेल्या युतीची वकिली करतात; मात्र अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देश त्यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. अमेरिकेने त्यांना व्हिसा दिला नाही. पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने मोदी यांच्यावरही व्हिसा बंदी घातली होती, तशीच ही गोष्ट आहे.