शिवकालीन हेरव्यवस्था !

आताच्या काळात उपग्रह, इंटरनेट आणि अन्य आधुनिक यंत्रणांद्वारे जगातील कोणतेही देश कोणत्याही देशात हेरगिरी करू शकतात; पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंटरनेट, भ्रमणभाष, संगणक आणि अन्य कोणतेही अद्ययावत उपकरणे नव्हती. याचसमवेत जलद गतीने कोणत्याही देशात वा राज्यांत जाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठी युद्धे कशी लढली ? मावळ्यांना बरोबर घेऊन कशा प्रकारे हेरगिरी केली ? तत्कालीन मोगल सत्ताधीश, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही यांची हेरगिरीची व्यवस्था कशी होती ? तसेच युद्ध आणि हेरगिरी यांची सांगड घालून तत्कालीन युद्धे कशी लढली गेली, याचा ऊहापोह करणारा लेख १९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘शिवजयंती’च्या निमित्ताने येथे देत आहोत.

१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हेरगिरी आणि युद्ध, शत्रू-मित्र अन् युद्ध यांचा संबंध, पातशाह्यांची हेरव्यवस्था आणि मोगल साम्राज्याची हेरव्यवस्था’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/765784.html

मावळ्यांशी चर्चा करून युद्धनीती आखतांना छत्रपती शिवाजी महाराज

७. मोगल बादशाहकडून वृत्तलेखक नेमले असण्याची स्पष्टोक्ती !

सुरतहून आस्थापनेला पाठवण्यात आलेल्या २८ जानेवारी १६६४ या दिनांकाच्या इंग्रजी पत्रात बादशाहने शहरात ‘Public and Private Intelligencers’ (प्रकट आणि गुप्त वृत्तांतलेखक) असे दोन्ही प्रकारचे वृत्तलेखक ठेवले असल्याचे नमूद केले आहे. तेथे वाकिआनवीस (वृत्तांतलेखक) आणि खुफियानवीस (गुप्तलेखक) असे शब्द वापरले नसले, तरी तेच पदाधिकारी तेथे अभिप्रेत आहेत.

८. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात हेरगिरीचा उल्लेख !

कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रात एक प्रकरण हेरांविषयी लिहिले आहे. ‘चारैः पश्यन्ति राजानः ।’ म्हणजे ‘राजे हेररूपी डोळ्यांनी पहातात.’ (महाभारत, पर्व ५, अध्याय ३४, श्लोक ३४) असे त्यात वचन आहे. कौटिल्याने राजकारणाच्या सर्व अंगांना स्पर्श करून स्वतःचा ग्रंथ लिहिला आहे.

९. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेले ‘आज्ञापत्र’ !

सत्ता कोणतीही असो, हेरखात्यातील असामी आणि त्यांचे कार्य हे नेहमीच गोपनीय राखले जाते; म्हणून राजांच्या कारभाराच्या या अंगाविषयी कागदोपत्री काही पुरावे मिळणे संभवनीय नाही. एक बहिर्जी नाईक तेवढाच कसातरी प्रकाशात आलेला दिसतो. असे असले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळची हेरव्यवस्था कशी असावी ? याचे विवेचन करतांना महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्रा’चा आधार घेता येतो.

रामचंद्रपंत अमात्य विरचित ‘आज्ञापत्राच्या कलम क्रमांक ३० मध्ये ‘हेरांची योजना’ याविषयी माहिती दिलेली आहे. (टीप : ही माहिती जशीच्या तशी येथे देत आहोत. यात व्याकरणदृष्ट्या पालट केलेले नाहीत.) ‘राज्याचा यखतियार सरकारकूनावर द्यावा. (परंतु) त्याणी सांगावे तेव्हाच आपणास कळावें यैसे सर्वथा न करावे. आणखी आपले मायेचा विश्वासू मनुष्य त्यासमागमे देशांत, गडकिल्ले यांत आणि सेवेत ठेऊन त्यांचे हाते किंबहुना वार्तिक मुखे वरचेवरी वर्तमान मनास आणून खबरदार असावे. त्यामुळे त्यांणी केली सेवा, कार्यविशेष आणि देशांत जाला न्यायान्याय, आपणास छद्म होऊ न पावता तत्क्षणी कळतो. तदनुरुप पारपत्य केले जाते. अन्यायी अनायसेंच शासन पाऊन हालखुद राहतात.’

(आशय : राज्यकारभार मुख्यमंत्र्यांवर सोपवलेला असला, तरी एकंदरीत राज्यकारभारासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्याने सांगितली, तरच राजास कळावी, असे होऊ नये. राजाजवळ माहिती गोळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यामुळे स्वराज्यात नेमलेले अधिकारी आपापली कामे लावून दिलेल्या शिस्तीप्रमाणे वेळच्या वेळी इमानाने करतात कि नाही, याची देखरेख मुख्यमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ठेवत, तसेच प्रत्येक गड-दुर्ग, प्रत्येक महाल, प्रत्येक सुभा, प्रत्येक छावणी आणि स्वारी यांतील अधिकार्‍यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हेर अन् बातमीदार ठेवलेले असत. त्या सर्वांचा नाईक बहिर्जी होता. त्याच्यावर महाराजांचा पूर्ण विश्वास असे.)

१०. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रभावी हेर खाते

१० अ. महाराजांचे हेर ! : मुलुखगिरीवर पाठवलेल्या लष्करातील अंमलदार केलेल्या लुटीचा आणि मिळवलेल्या खंडाचा हिशोब बरोबर देतात कि त्यात काही अफरातफर करतात ? हे पहाण्यासाठी महाराज प्रत्येक स्वारीसमवेत हेर पाठवत. प्रत्येक गडावरील अंमलदार आपली कामे शिस्तीत करतात का ? ते पहाण्यासाठी महाराजांचे हेर सर्वत्र फिरत. महालकरी, सुभेदार वगैरे मुलकी खात्यातील अधिकारी रयतेस त्रास देतात कि काय ? आणि वसूल केलेल्या उत्पन्नाचा ऐवज सरकारात इमानाने जमा करतात किंवा कसे ? हे पहाण्यासाठी प्रत्येक प्रांतातून महाराजांचे हेर फिरत. तसेच परमुलुखातील स्थिती, शत्रूची हालचाल, आदिलशाही, कुतूबशाही, तसेच मोगल आदी दरबारात काय मसलती चालल्या आहेत, याची माहिती वेळोवेळी मिळवावी लागे. त्यासाठी महाराजांचे हेर वेगवेगळ्या वेषाने सर्वत्र वावरत.

बहिर्जी नाईक

१० आ. छत्रपती शिवरायांची चाणाक्ष रणनीती ! : कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगितले आहे की, हेर हे साधू, बैरागी, मंत्र-तंत्रवाले, जादूगार, भिकारी अशा वेगवेगळ्या अन् वरकरणी कळू न येणार्‍या रूपात पाठवावेत. या हेरांनी विषप्रयोग करण्यातही तरबेज असावे आणि प्रसंगी तो करावा. कौटिल्याच्या मतानुसार हेराला कोणतीही गोष्ट निषिद्ध नाही. जी काही माहिती हेरांना मिळत असे, ती तपशीलवार लिहून ते महाराजांस वेळोवेळी कळवत. हेरांकडून आलेली पत्रे महाराज एकांतात बाळाजी आवजी चिटणीस यांच्याकडून वाचून घेत. त्यावर विचार करून महाराज विलक्षण बुद्धीने योग्य तो निर्णय घेत असत.

महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहिले असता आपल्याला महाराजांच्या चाणाक्ष रणनीतीचा प्रत्यय दाखवणार्‍या अनेक घटना आढळतात. फत्तेहखान, अफझलखान, शाहिस्तेखान यांच्या स्वार्‍या, सिद्धी जौहरची स्वारी, मिर्झाराजा जयसिंगाची स्वारी, तसेच महाराजांची आगर्‍याहून सुटका, दक्षिण दिग्विजय, सुरतची लूट आणि बसरुरची स्वारी अशा काही ठळक घटना अन् मोहिमा पहातांना एक गोष्ट स्पष्ट जाणवते, ती म्हणजे महाराजांचे हेरखाते अत्यंत प्रभावी होते. आपल्या प्रत्येक मोहिमेत सुरक्षित मार्ग शोधणे, शत्रूची हालचाल पहाणे, मोहिमेचे वेळापत्रक आखणे या गोष्टी जाणकार आणि मुरब्बी हेराविना होणे शक्य नव्हते. फत्तेहखान आणि अफझलखान यांच्या स्वार्‍या या दोन प्रसंगी शत्रूच्या हालचाली डावपेचांची अचूक माहिती महाराजांपर्यंत पोचत होती. कारतबलखानच्या मोहिमेच्या वेळी त्याच्या एकेका घंट्याने हालचालींची बातमी महाराजांना पोचत होती आणि त्याप्रमाणे ते स्वतःचे डावपेच आखत होते, असे दिसते.

१० इ. छत्रपती शिवरायांना लाभलेले मुत्सद्दी दूत ! : राजाने पाठवलेला दूत हासुद्धा एका दृष्टीने हेरच असतो. कौटिल्याने दूताचे कार्य आणि महत्त्व विस्ताराने वर्णन केले आहे. शत्रूच्या गोटात भेद करणे, छिद्रे शोधणे आणि घात करणे आदी कार्ये दूतास दिलेली आहेत. शत्रूंशी बोलणी करण्यासाठी सोनोपंत डबीर, पंताजी गोपीनाथ यांसारखे श्रेष्ठ दर्जाचे ‘मुत्सद्दी दूत’ म्हणून महाराजांना लाभले होते.’

– श्री. दीपक हनुमंतराव जेवणे

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक १९९८)

हेर करत असलेली कामे आणि कर्तव्ये

अफझलखान, सिद्धी जौहर, शाहिस्तेखान आणि मिर्झाराजा यांनी महाराजांच्या विरोधात दीर्घकाळ मोहिमा चालवल्या होत्या. या मोहिमांचा अभ्यास करतांना असे जाणवते की, महाराजांनी आपले हेर या शत्रूसैन्याच्या गोटात पेरले होते. यामुळेच त्यांच्या हालचाली महाराजांना वेळोवेळी कळत होत्या. सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला असतांना त्यातून सुरक्षितपणे विशाळगडावर निसटून जाणे हे मोठे जिकिरीचे काम होते. त्यासाठी सिद्धी जौहरच्या वेढ्याची अचूक माहिती, त्याच्या सैन्याच्या हालचाली आणि पन्हाळा ते विशाळगड या मार्गाची व्यवस्थित माहिती महाराजांना उत्कृष्ट हेरामुळेच मिळू शकली. महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले आणि त्यांना नजरकैद केले असतांना कडेकोट बंदोबस्तातून निसटून सुखरूपपणे ते स्वराज्यात परत आले. यासाठी जे नियोजन करावे लागले, त्यासाठी हेरांचे त्यांना अमूल्य साहाय्य झाले असणारच ! दरबारातील बातम्या मिळवणे, शत्रूच्या चौक्यांची माहिती मिळवणे, आग्रा ते राजगड सुरक्षित मार्ग निवडणे, मार्गावरील शत्रूची माहिती घेणे आणि खोट्यानाट्या अफवा पिकवणे ही कामे हेरांनीच केलेली होती.

– श्री. दीपक हनुमंतराव जेवणे

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक १९९८)

 छत्रपती शिवाजी महाराज राजे होते; परंतु ते कसे होते ? समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांसी आधारू श्रीमंतयोगी !’ याउलट आताचे सर्वपक्षीय शासनकर्ते, म्हणजे ‘भ्रष्टाचाराचे महामेरू, अखंड खुर्चीसाठी निर्धारू, देशद्रोह्यांचा आधारू, श्रीमंत रोगी !’

– एक धर्मप्रेमी