उद्या दिनांक (१९ फेब्रुवारी २०२४) या दिवशी ‘शिवजयंती’ आहे. त्या निमित्ताने…
हेरखाते (गुप्तहेर) अत्यंत प्रभावी असेल, तर मोहिमा आणि युद्ध यांमध्ये विजय प्राप्त होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय !
आताच्या काळात उपग्रह, इंटरनेट आणि अन्य आधुनिक यंत्रणांद्वारे जगातील कोणतेही देश कोणत्याही देशात हेरगिरी करू शकतात; पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंटरनेट, भ्रमणभाष, संगणक आणि अन्य कोणतेही अद्ययावत् उपकरणे नव्हती. याचसमवेत जलदगतीने कोणत्याही देशात वा राज्यांत जाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठी युद्ध कशी केली ? मावळ्यांना समवेत घेऊन कशा प्रकारे हेरगिरी केली ? तत्कालीन मोगल सत्ताधीश, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही यांची हेरगिरीची व्यवस्था कशी होती ? तसेच युद्ध आणि हेरगिरी यांची सांगड घालून तत्कालीन युद्धे कशी लढली गेली, याचा ऊहापोह करणारा लेख १९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘शिवजयंती’च्या निमित्ताने येथे देत आहोत.
१. हेरगिरी आणि युद्ध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचा ‘कानून जाबता’ (नियम) पाहिल्यानंतर आढळते की, पंडितराव आणि न्यायाधीश हे दोन प्रधान वगळता बाकी सर्व प्रधानांच्या अखत्यारीत ‘युद्धादिप्रसंग’ ही गोष्ट अपरिहार्यपणे समाविष्ट करण्यात आली होती. युद्ध आणि हेरगिरी यांची सांगड घातली गेली असल्यामुळे हेरगिरीचा युद्धाच्या संदर्भात विचार हा करावाच लागतो.
२. शत्रू-मित्र आणि युद्ध यांचा संबंध !
युद्ध रणभूमीवर होत असले, तरी ते कुठे, केव्हा आणि कसे लढायचे, याचा निर्णय खलबतखान्यात (युद्धाची चर्चा करण्यासाठीचे वेगळे सभागृह) होतो. त्यासाठी आपल्या आणि शत्रूच्या बलस्थानांचा विचार करावा लागतो. युद्धाच्या संदर्भात परराज्यांशी असलेले संबंधही बलस्थानातच मोडतात. यालाच ‘अरिमित्र-विचक्षणा’ असे म्हणतात. अरि म्हणजे शत्रू ही मित्राचीच दुसरी बाजू असल्याने राजकारणाच्या संदर्भात शत्रू आणि मित्र कोण ? यांच्या विलक्षणेवर राज्यव्यवहाराचे धोरणही बर्याच अंशाने अवलंबून असते; परंतु राज्याच्या शत्रू-मित्रांसंबंधी ठोकताळे बांधता येत नाहीत. कालपरिस्थितीच्या मानाने शेजारी असलेल्या राज्यांशी राज्याची नाती पालटत असतात. ‘मित्रराज्य’ वा ‘शत्रूराज्य’ असा शिक्का कोणत्याही शेजारी राज्यावर मारता येत नाही.
नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं नाम न विद्यते ।
सामर्थ्ययोगाज्जायन्ते मित्राणि रिपवस्तथा ।।
– महाभारत, पर्व १२, अध्याय १३६, श्लोक १३२
अर्थ : जन्माने कुणी शत्रू किंवा मित्र नसतो. सामर्थ्यामुळे (शेजारी राष्ट्रे) परस्परांचे मित्र किंवा शत्रू बनतात.
३. शत्रूराज्यातील घटनांची नोंद घेणे आवश्यक !
‘मुळात कुणी शत्रू वा मित्रही नसतो. उभय पक्षांच्या सामर्थ्यांच्या योगाने (शेजारी असलेली राज्ये) शत्रू वा मित्र होतात’, हे महाभारतातील विधान याच वास्तवावर आधारलेले आहे. त्यामुळे आजचे मित्र उद्या शत्रूस्थानी येणार नाहीत, याची शाश्वती नसते, तसेच आजचे शत्रू भविष्यकाळात मित्र बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या राजाला एकापेक्षा अधिक शत्रू असतात, त्यालाही राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या शेजारी राज्यांच्या हालचालींवर त्याला सदैव लक्ष ठेवावे लागते; कारण शत्रूराज्ये एकटी किंवा संघटितपणे त्याच्या राज्यावर आक्रमण करून ते कधी धुळीस मिळवतील, हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे शत्रूराज्यात आणि परराज्यात घडणार्या विविध घटनांवर लक्ष ठेवून त्यांची नोंद घेणे आवश्यक असे. प्राप्त माहितीचे योग्य विश्लेषण करावे लागत असे आणि तिचा योग्य तो अर्थ समजून घ्यावा लागत असे.
४. राजाला सर्व बातम्या पुरवल्या जाण्यामागील प्रक्रिया !
ज्या राजाच्या साम्राज्यात एकाहून अनेक प्रांत असत, त्याला आपल्या प्रांतांचे अधिकारी आणि सुभेदार यांवर लक्ष ठेवावे लागत असे. एखादा सुभेदार कधीही बंड करून उठण्याची वा शत्रूला फितूर होण्याची शक्यता असे. त्यामुळे तेथील घडामोडींच्या बातम्या राजाला योग्य वेळेत प्राप्त होणे आवश्यक असे. परिणामी प्रत्येक राजाला स्वतःच्या राज्यात आणि परराज्यातही उघडपणे अन् गुप्तपणे स्वतःचे बातमीदार पेरून ठेवावे लागत असत. हे बातमीदार वेळोवेळी राजाला बातम्या पोचवत असत. काही बातम्या विशेष नसत. त्यात साध्या घडामोडींचे वर्णन असे; पण काही बातम्या अतिशय गोपनीय असत. त्या फुटल्यास त्यांचे महत्त्व नष्ट होत असे. त्यामुळे अशा बातम्या राजाजवळ गुप्तपणे पोचणे आवश्यक असे. काही वेळा अशा बातम्यांच्या आणि त्या पुरवणार्या हेरांच्याही सुरक्षिततेसाठी त्या राजाला कोण पुरवतो, याचा सुगावा कुणालाही न लागणे आवश्यक असे. या दृष्टीने अशा बातम्या पुरवणार्या हेराचे नाव गुप्त राखले जाई आणि त्याच्या कामाविषयी सदैव गुप्तता बाळगली जाई. या सर्व गोष्टींच्या भोवती गूढतेचे वलय निर्माण झाले. अर्थात् हे हेर म्हणजे एका दृष्टीने राजाला बातमी पुरवणारे बातमीदारच असत.
५. पातशाह्यांची हेरव्यवस्था !
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रामुख्याने ज्यांच्याशी संबंध आला, अशी राज्ये म्हणजे देहलीचा मोगल सत्ताधीश, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही यांचा अंमल असलेली राज्ये होय. ‘या प्रत्येक सत्ताधिशाची राज्यकारभाराच्या सोयीसाठी स्वतंत्र हेरव्यवस्था असावी’, असे वाटते. यासंबंधीची माहिती आज उपलब्ध असलेल्या तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांवरून कळू शकते; मात्र हेरव्यवस्था गोपनीय राखायची असल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळणे जिकिरीचे आहे. ‘अशा हेरांच्या कामगिरींची नोंद करून ठेवणे सुरक्षित न वाटल्याने त्यासंबंधी कागदपत्रे उपलब्ध नाहीत’, असे वाटते.
६. मोगल साम्राज्याची हेरव्यवस्था
६ अ. बादशाहचा विचार करून वृत्तलेखक नेमणे : देहलीच्या मोगल साम्राज्याचा विचार करतांना आढळते की, साम्राज्यातील सर्व ठिकाणची बित्तंबातमी बादशाहला कळावी; म्हणून त्या सर्व ठिकाणी वृत्तलेखक नेमलेले असत. त्यांना ‘वकाए नवीस’ किंवा ‘वाकिआनिगार’ असे म्हटले जात होते. वकाए म्हणजे बातम्या, वृत्तांत, वाकिआ म्हणजे घटना, वृत्तांत. नवीस किंवा निगार म्हणजे लिहिणारा. या वृत्तलेखकांना ‘वकाएनिगार’ किंवा ‘वािकआनवीस’, असेही म्हटले जायचे.
६ आ. बादशाहकडे पाठवली जाणारी वृत्ते आणि वृत्तलेखकाचे कार्य : स्वारीवर नेमलेली प्रत्येक फौज, प्रत्येक सुभा, प्रत्येक गड आणि प्रत्येक मोठे शहर या सर्व ठिकाणी वृत्तलेखक नेमले असत. त्यांनी लिहिलेला वृत्तांत प्रत्येक आठवड्याला बादशाहकडे पाठवला जात. तो बादशाहपुढे ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमला जात असे. ‘अनेक ठिकाणांहून येणारी सर्वच बातमीपत्रे बादशाहपुढे ठेवली जात असावीत’, असे शक्य वाटत नाही. काही निवडक बातमीपत्रेच बादशाहच्या पुढे जात असावीत. त्यामुळे ‘त्यांची निवड करण्याचे दायित्वही विशेष अधिकार्यांकडे दिले असावे’, असे वाटते. बादशाहनाम्यातील नोंदीनुसार या कामासाठी ‘खिदमत-इ-वकाए-इ सूबजात’ (सुभ्यांच्या बातमीपत्रांची सेवा) असा शब्द योजला आहे. हे वकाएनवीस मनसबदार असत आणि त्यांची नेमणूक बादशाहच्या हुकूमाने होत असे.
६ इ. बातमीपत्रात तपशीलवार वर्णन ! : या वकाएनवीसांनी पाठवलेली बातमीपत्रे पहाता असे दिसते की, विविध विषयांवरील बातम्या त्यांच्या वृत्तांतामध्ये येत असत. निरनिराळ्या पथकांच्या हालचाली, आर्थिक उलाढाली, निरनिराळ्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे बाजारभाव, महत्त्वाच्या व्यक्तीचे येणे-जाणे, गुन्हेगारी, हवा-पाणी, विचित्र घटना आदी विषयांचा या बातमीत समावेश केला जात असे. काही वेळा घटनांचे बातमीपत्रात अधिक तपशीलवार वर्णन केलेले असे. त्या काळी भारतात आलेल्या काही परकियांना अशी बातमीपत्रे पहायलाही मिळाली होती. त्यातील बारीकसारीक घटनांचे तपशीलवार वर्णन पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले होते.
गोदीज्जू नावाच्या पोर्तुगीज मिशनर्याने जानेवारी १६३३ मध्ये सूरत शहरात भेट दिली होती. या भेटीचा वृत्तांत लिहितांना तो म्हणतो, ‘…सुरतेच्या नबाबावर आणि इतर अधिकार्यांवर राजकीय अन् इतर गोष्टींत लक्ष ठेवण्यासाठी मोगल बादशाहने सुरतेत एक मुसलमान नेमलेला आहे. तो बादशाहला नबाबाच्या कृत्यांची माहिती कळवत असतो.’
६ ई. बातमीपत्रांची सुरक्षितता ! : बादशाहला पाठवल्या जाणार्या बातमीपत्रांच्या सुरक्षिततेविषयी विशेष काळजी घेतली जात असे. त्यासाठी ‘नलवा’ (बांबूची नळी) हे साधन वापरले जात असे. बादशाह आणि प्रमुख अधिकारी यांना पाठवल्या जाणार्या पत्रांच्या सुरक्षिततेसाठी ती १ फूट लांबीच्या मोठ्या पोकळ बांबूत बंद केली जात. त्याच्या एका टोकाला २ इंच लांबीचे झाकण असे. पत्र आत ठेवल्यावर ते झाकण बांबूला लावून त्याच्या सांध्यावर मोहर केली जात असे. यालाच ‘नलवा’ असे म्हटले जात असे.
वकाएनवीसांविना बादशाह सुभ्यांच्या कारभारावर गुप्त लक्ष रहावे, म्हणून गुप्त वृत्तांत लेखकांची नेमणूक करत असे. त्यांना ‘खुफियानवीस’ असे म्हणत. ते सुभ्यांमध्ये गुप्तपणे रहात. आपले वृत्तांत थेट बादशाहकडे पाठवत. बादशाहने ‘प्रत्येक सुभ्यात आणि सरकारात वाकिआनवीसाविना एक विश्वासू तेथील बातम्या गुप्तपणे पुरवण्यासाठी नेमला आहे’, असे ‘आलमगीरनामा’मध्ये म्हटले आहे. ‘मिरात-इ-अहमदीत’ त्या पदाला ‘सवानिहनवीस’ (वृत्तलेखक) म्हटले आहे. त्यालाच खुफियानवीस (गुप्तलेखक) असे म्हणतात, असे नमूद केले आहे. ‘मानुचीने वाकियानवीस म्हणजे प्रकट वृत्तांतलेखक अन् खुफियानवीस म्हणजे गुप्त वृत्तांतलेखक’, असे अर्थ नमूद केले आहेत.
दुसर्या राजाच्या दरबारात नेमलेले बादशाहचे वकीलही बादशाहला गुप्त बातम्या कळवण्याचे काम करत असत. प्रसंगी ते दुसर्या राजाचे अधिकारी वा सुभेदार फोडण्याचेही काम करत असत. तरीसुद्धा वाकिआनवीस किंवा वकील यांना गुप्तहेर म्हणता येत नाही. शत्रूविषयी बातम्या काढून त्या कळवण्याचे काम करणारे जे हेर असत, त्यांना ‘हरकारे’ वा ‘जासूस’ म्हटले जाई. ते मुख्यत्वेकरून शत्रूच्या लष्करी हालचालींच्या बातम्या कळवत. ते फिरते असत. खुफियानवीस आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी राहून गुप्तपणे बातम्या कळव. त्यांच्यावर ‘दारोघे’ (तत्कालीन सैन्यातील एक पद) नेमलेले असत. हे दारोघे मनसबदार असत.
– श्री. दीपक हनुमंतराव जेवणे
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक १९९८)