महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ज्योतिषशास्त्रीय संशोधन
‘सनातन संस्थे’ने स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्रांहून अधिक बालकांना सूक्ष्म परीक्षणाद्वारे (टीप) ओळखले आहे. त्यांना ‘दैवी बालक’ असे म्हटले आहे. ही बालके जन्मतः आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असतात. ‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
टीप – एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
(भाग १)
१. दैवी बालक म्हणजे काय ?
दैवी बालक म्हणजे स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून जन्मलेला जीव. सनातन धर्माने ‘भू, भुव, स्वर्ग, महर्, जन, तप आणि सत्य’ या सप्तलोकांची संकल्पना सांगितली आहे. त्यांपैकी भूलोक म्हणजे पृथ्वीलोक दृश्य असून अन्य लोक अदृश्य म्हणजे सूक्ष्म आहेत. जिवाचे अंतःकरण (मन, बुद्धी आणि चित्त) सात्त्विक (शुद्ध) असल्यास त्याला मृत्यूनंतर उच्च लोक प्राप्त होतो. याउलट अंतःकरण तामसिक (अशुद्ध) असल्यास जिवाला नीच लोक प्राप्त होतो.
याविषयी श्रीमद्भगवद्गीतेतील पुढील वचन मार्गदर्शक आहे. गीतेच्या ‘गुणत्रयविभागयोग’ या अध्यायाच्या १८ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की, सत्त्वगुणप्रधान व्यक्तीचा लिंगदेह मृत्यूनंतर उच्च लोकांत (स्वर्ग, महर्, जन इत्यादींमध्ये) स्थान प्राप्त करतो; रजोगुणप्रधान व्यक्तीचा लिंगदेह मृत्यूनंतर पुन्हा मनुष्ययोनीत जन्म घेतो; तर तमोगुणप्रधान व्यक्तीचा लिंगदेह मृत्यूनंतर पशू, कीटक इत्यादी नीच योनीत जन्म घेतो.
‘अंतःकरण शुद्ध, म्हणजे सात्त्विक असणे’, हे व्यक्तीच्या साधनेवर अवलंबून असते. दैवी बालकांची पूर्वजन्मांची साधना असल्यामुळे त्यांचे अंतःकरण सात्त्विक असल्याने त्यांना उच्च लोक प्राप्त झालेला असतो. अशा दैवी बालकांचा पुढील कारणांसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म होतो.
अ. व्यष्टी साधना : स्वतःची पुढील आध्यात्मिक उन्नती साध्य करणे.
आ. समष्टी साधना : समाजाची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी योगदान देणे.
२. दैवी बालकांची वैशिष्ट्ये
दैवी बालकांचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे त्यांना जन्मतः साधना करण्यासाठी अनुकूल परिस्थिती लाभते. याविषयी अधिक विवेचन पुढे दिले आहे.
२ अ. साधनेची तळमळ असणे : दैवी बालकांचा कल मूलतः अध्यात्माकडे असतो. पूर्वजन्मी केलेल्या साधनेमुळे त्यांच्या चित्तावर साधनेचे संस्कार दृढ असतात. त्यांना मायेतील सुख-दुःख आणि अध्यात्मातील आनंद यांतील भेद कळतो. त्यामुळे मायेतील गोष्टी प्राप्त करण्यापेक्षा ती अधिकाधिक साधना करण्याला प्राधान्य देतात.
२ आ. आध्यात्मिक गुण असणे : दैवी बालकांमध्ये ऐकण्याची वृत्ती असणे, इतरांचा विचार करणे, शिकण्याची वृत्ती असणे, नम्रता, प्रामाणिकपणा आदी आध्यात्मिक गुण असतात. या गुणांमुळे त्यांच्यात साधना करण्याची क्षमता चांगली असते.
२ इ. साधनेसाठी कुटुंबियांचा पाठिंबा असणे : साधारणतः दैवी बालकांचा जन्म सात्त्विक आई-वडिलांच्या पोटी होतो. त्यामुळे बालकांवर बालपणापासून सात्त्विकतेचे संस्कार होतात, तसेच त्यांना साधना करण्यासाठी आई-वडिलांकडून प्रोत्साहन मिळते.
२ ई. प्रारब्ध सुसह्य असणे : साधारणतः दैवी बालकांचे प्रारब्ध सुसह्य असते. त्यामुळे एरव्ही खडतर प्रारब्धाला सामोरे जाण्यासाठी लागणारे बळ, वेळ आणि ऊर्जा यांचा उपयोग त्यांना साधनेसाठी करता येतो.
२ उ. गुरुकृपा आणि गुरुप्राप्ती होणे : दैवी बालकांच्या जन्माचा उद्देश ‘मोक्षप्राप्ती’ असल्याने त्यांना ईश्वरी नियोजनाप्रमाणे गुरुप्राप्ती होते. गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे त्यांना साधनेची योग्य दिशा प्राप्त होते आणि गुरुकृपेमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती लवकर होते.
३. दैवी बालकांची अन्य वैशिष्ट्ये
३ अ. सात्त्विकतेची ओढ असणे : दैवी बालकांमध्ये जन्मत: सत्त्वगुण अधिक असतो. त्यामुळे ती सात्त्विक व्यक्तींकडे आणि संतांकडे, तसेच सात्त्विक गोष्टींकडे उदा. देवतेचे चित्र, संतांनी वापरलेल्या वस्तू आदींकडे आकर्षित होतात.
३ आ. देवाप्रती भाव असणे : दैवी बालके देवतेच्या मूर्तीशी बोलणे, देवतेचे चित्र सोबत बाळगणे, देवांशी संबंधित खेळ खेळणे आदी कृती करून देवाशी अनुसंधान साधतात.
३ इ. प्रगल्भ बुद्धी असणे : आकलनक्षमता चांगली असणे, नियोजन करणे, लिखाण करणे, योग्य-अयोग्य यांची पारख असणे, आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार करणे आदी वैशिष्ट्ये दैवी बालकांची बुद्धी प्रगल्भ असल्याचे दर्शवतात.
३ ई. प्रतिभा जागृत असणे : अनेक बालकांमध्ये उत्स्फूर्त काव्य करणे, भावमय चित्र काढणे, भावपूर्ण गायन-वादन-नृत्य करणे, अशी वैशिष्ट्ये त्यांची प्रतिभा जागृत असल्याचे दर्शवतात.
३ उ. सूक्ष्मातील कळणे : दैवी बालकांना पंचज्ञानेंद्रिये (कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्मातील कळते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद) आणि श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१.२०२४)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/768035.html