श्री काशीविश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी दिशादर्शन करणारे फलक हवेत !

१ फेब्रुवारी या दिवशी वाराणसीतील प्रसिद्ध श्री काशीविश्वनाथ मंदिरात दर्शनाला जाण्याची संधी मिळाली. यापूर्वी साधारण १५ वर्षांपूर्वी मी श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले होते. अलीकडेच ‘श्री काशीविश्वनाथ कॉरिडॉर’ अर्थात् सुसज्ज मार्ग करण्यात आला. त्यानंतर तेथे जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्या वेळी लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहे.

१. मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट !

श्री. नीलेश कुलकर्णी

पूर्वी मंदिराकडे जाणारा मार्ग अत्यंत चिंचोळा होता. अत्यंत अरूंद आणि गर्दी असलेल्या या मार्गामुळे भाविकांची तारांबळ उडत असे. आता येथे सुसज्ज मार्ग केल्यानंतर मंदिर आणि मंदिराचा परिसर यांचा संपूर्ण कायापालट झाला आहे. मंदिराचा परिसर अत्यंत प्रशस्त केला आहे. तेथील प्रशासकीय व्यवस्थेत सुटसुटीतपणा आणला आहे. वाराणसी हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यांनीच या सुसज्ज मार्गाचे डिसेंबर २०२१ मध्ये उद्घाटन केले आहे. या मंदिराला गंगा नदीवरील जोडण्यात आलेले घाट, हे या सुसज्ज मार्गाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

२. दोन रांगांमुळे भाविकांचा गोंधळ !

मी पूर्वी दर्शनाला आलो असल्याने मला त्या वेळचेच मंदिर आठवत होते. साहजिकच त्या स्मृती डोळ्यांसमोर ठेवून प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून तपासणी करून घेऊन मी मंदिरात प्रवेश केला. तेव्हा मला समोर दर्शनाच्या २ रांगा दिसल्या. मी त्यांतील एका रांगेत उभा राहिलो. साधारण पुढच्याच मिनिटाला ‘आपण योग्य रांगेत उभे आहोत ना ?’, असे वाटून मी माझ्या पुढच्या व्यक्तीला ‘दोन्ही रांगा नेमक्या कुठे जातात ?’ असे विचारले. त्या व्यक्तीलाही काही नीट सांगता आले नाही. त्यामुळे आणखी दोघांना विचारले, त्यांनाही फारशी कल्पना नव्हती; म्हणून मग मीच अंदाज लावून माझी रांग सोडून दुसर्‍या रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळाने दुसरी रांगच मुख्य रांग असल्याचे माझ्या लक्षात आले. मग मी अन्य काही भाविकांना साहाय्याच्या हेतूने तसे सांगितले. पहिली रांग तेथील नंदीचे दर्शन घेण्यासाठी, तर दुसरी रांग मुख्य मंदिरात, म्हणजे श्री काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठीची होती. यावरून माझ्या लक्षात आले की, मी यापूर्वी येऊनही माझा इतका गोंधळा होत असेल, तर नवीन आलेल्या भाविकांचा किती होत असेल ? ही गोष्ट मी तेथील एका पुजार्‍यांना सांगितली. त्यावर त्यांनीही ‘तुमचाच काय, सर्वांचाच गोंधळ उडतो’, असे मला सांगितले. त्यावर मी त्यांना ‘मग तुम्ही दिशादर्शक फलक लावायला सांगू शकता का ?’, असे विचारले. त्यावर त्यांनी फारशी सिद्धता दर्शवली नाही. त्यामुळे मंदिरात प्रवेश केलेल्या भविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी ‘त्यांनी पुढे नेमके कसे आणि कुठे जायचे ?’, याचे नेमके दिशादर्शक फलक लावले पाहिजेत, असे लक्षात आले.

३. श्री काशीविश्वेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन !

सहसा गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक भाविकांना पुढे ढकलत असल्याचे आपण अनेक मंदिरांत पाहिले असेल; परंतु श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतांना तेथील सुरक्षा रक्षक भाविकांना सहकार्य करत असल्याचे पाहून चांगले वाटले. तेथे अखंड मंत्रोच्चारांचा नाद घुमत होता. भाविकही ‘ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव’चा जयघोष करत होते. एकूणच वातावरण अत्यंत सात्त्विक होते. अशात श्री गुरुंच्या कृपेने श्री काशीविश्वेश्वराचे भावपूर्ण दर्शन घेता आले.

४. अनेक मंदिरे असल्याने योग्य दर्शनव्यवस्था हवी !

या मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मला ‘आता पुढे कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे ?’, असा प्रश्न पडला. पुन्हा एका व्यक्तींला विचारले. तिने समजावून सांगितले. त्यानुसार पुढील वेगवेगळ्या मंदिरांत दर्शन घेतले. त्यामुळे ‘मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी पुढच्या कुठल्या मंदिरांत दर्शन घ्यायचे ?’, हे प्रशासनानेच ठरवून त्याप्रमाणे दर्शनव्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून भाविकांना कुठला प्रश्नच पडणार नाही.

५. श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर भाविकांना पुन्हा तपासणीसाठी रांगेत थांबावे लागते !

श्री अन्नपूर्णादेवीचे मंदिर हे श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसराला लागून आहे. श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरातील अन्य मंदिरांचे दर्शन घेतांना भाविक श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात जातात. तेथे दर्शन घेऊन आल्यानंतर श्री काशीविश्वेश्वर मंदिरात परत येण्यासाठी भाविकांना पुन्हा प्रवेशासाठीच्या तपासणी रांगेत थांबून स्वतःची तपासणी करून घ्यावी लागते. त्यात भाविकांचा वेळ जातो. त्यामुळे ‘श्री काशीविश्वेश्वर मंदिराच्या परिसरातील सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर श्री अन्नपूर्णादेवीचे दर्शन घेऊन तेथूनच बाहेर पडण्याची व्यवस्था केली, तर भाविकांच्या अधिक सोयीचे आणि वेळ वाचवणारे ठरेल’, असे वाटते. ‘श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात अगोदर दर्शन घेऊन नंतर श्री काशीविश्वश्वराचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली, तर तसेही चालू शकते’, असे वाटले.

६. मंदिराचा इतिहास दर्शनी भागात हवा !

महादेवाच्या कुठल्याही मंदिरात शिवपिंडीसमोर नंदी असतोच; परंतु या मंदिराच्या परिसरातील नंदी मशिदीच्या भिंतीकडे मुख असलेला आहे ! त्यामुळे या नंदीचे दर्शन घेतांना प्रथमच आलेल्या भाविकाला काहीच कळत नाही किंवा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या शंकेचे निरसन करायला तेथे एकतर मार्गदर्शक (गाईड) असायला हवा किंवा त्या ठिकाणी इतिहास लिहिलेला ठळक फलक असायला हवा. क्रूरकर्मा औरंगजेब याने काशीचे मंदिर पाडून त्यावर मशीद बांधली. तीच आजची ज्ञानवापी ! ‘त्या वेळच्या मंदिरासमोरचा हा नंदी आहे’, असे आजही तेथील लोक सांगतात. यातून ‘भाविकांना सत्य इतिहास समजण्यात साहाय्य होईल’, असे वाटते.

७. भाविकांचे दर्शन सुकर व्हावे !

भाविक श्री काशीविश्वेशराच्या दर्शनासाठी पुष्कळ दूरदूरच्या राज्यांतून येत असतात. सध्याचे प्रशस्त मंदिर पाहून भाविक समाधान व्यक्त करतात. यासह मंदिर प्रशासनाने वरीलप्रमाणे काही पालट केले आणि भाविकसांठी सूचना वही ठेवली, तर त्यात भाविक नोंदी करू शकतील. यामुळे भाविकांचे दर्शन सुकर होईल आणि साक्षात् भगवान श्री महादेवाच्या दर्शनाचे अमूल्य क्षण स्वतःच्या ह्रदयमंदिरात कायमस्वरूपी कोरून ठेऊन ते आनंदाने आपापल्या घरी परतू शकतील !

– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’. (१३.२.२०२४)