मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते. किडनी निकामी होण्याचा त्रास असलेल्यांना पुढे जाऊन हृदयाच्या आवरणात पाणी होणे, हृदयावर ताण येण्यासारखी लक्षणे दिसतात. आयुर्वेदात याचा सखोल अभ्यास करत ‘त्रिमर्मीय चिकित्सा’, ‘सिद्धी’ यांसारखे अध्यायच आलेले दिसतात. त्यामुळेच रक्तदाब वाढल्याने किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो, हे लक्षात घेत संबंधित चाचण्या वेळेत करवून घेणे आणि वेळप्रसंगी आज त्या सर्वसाधारण दिसत असल्या, तरी पुढे धोका निर्माण होऊ नये; म्हणून पहिल्या दिवशीपासूनच औषध आणि पथ्य यांत ती काळजी घेणे या पद्धतीने आयुर्वेद काम करते.
दुसरीकडे कोणत्याही कारणास्तव किडनीची कार्यक्षमता न्यून झाल्याचे लक्षात येताच (Chornic Renal Disease) केवळ लघवीला अधिक करणारी औषधे (Diuretics) देण्याचा विचार न करता हृदयाला बळ देणारी औषधेही आयुर्वेदानुसार चालू केली जातात. ‘परिस्थिती टोकाची असता किडनी ‘ट्रान्सप्लांट’ (दुसर्याची किडनी बसवणे) सांगितले जाते. ते केले, म्हणजे आपला प्रश्न संपला’, असा गैरसमज काही रुग्णांचा असतो; मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. काही काळाने त्या किडनीचे कामही मंदावू लागल्याचे प्रत्यक्ष पहायला मिळते. अशा अवस्थांमध्येही ही स्थिती निर्माणच होऊ नये, याकरताही आयुर्वेद उत्तम काम करते. याला कारण ‘मर्म’ आणि ‘विष’ या संकल्पनेचे आयुर्वेदाचे व्यापक आकलन होय. रुग्ण शक्यतो ‘डायलिसिस’वर (रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया) जाऊच नये, यासाठी आयुर्वेद उपयोगाला येतो आणि डायलिसिस चालू असेल तरी ! यालाही कारण वरच्या दोन संकल्पनाच होत. सामान्य वाचकाला साधारण अंदाज यावा म्हणून अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष आयुर्वेदात या संकल्पना आणि त्यातील संबंध हे पुष्कळ तपशीलवार अन् जटील; मात्र अतिशय रोचक आणि वैद्यकीयदृष्ट्या उपयोगी आहेत.
आयुर्वेदातील एक एक संकल्पना आताच्या काळात अतिशय सुसंगत आणि येणार्या काळात अधिकच सुसंगत होत जाणार आहेत. वैद्यांनी स्वतःला अद्ययावत् ठेवले आणि रुग्णांनी वेळेत निष्णात वैद्यांचा सल्ला घेतला, तर बरेच चित्र पालटू शकते. शरीर हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. इथे अनेक यंत्रणा एकमेकांवर अवलंबून राहून काम करत असतात, याचे पुरेपूर ज्ञान आयुर्वेदाला असल्याने १० तक्रारींकरता १० गोळ्या देण्यापेक्षा त्यातील संबंध लक्षात घेत न्यूनतम औषधयोजना आयुर्वेद करू शकते, इतका मोठा आवाका आयुर्वेदाकडे आहे !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१३.२.२०२४)