प्राचीन श्रीराममंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी केली १०० कोटी रुपयांची तरतूद ! (Karnataka Congress Restoration Of ShriRamTemples)

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निर्णय

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील प्राचीन श्रीराममंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही घोषणा वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे. धर्मादाय विभागाच्या योजनांमध्ये या प्रकल्पांचा समावेश करण्यासाठी चर्चा चालू आहे.

हे श्रीराममंदिरावर राजकारण नाही ! – धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी

धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांना जीर्णोद्धारासाठी निधी वाटपाचा प्रस्ताव दिला आहे. राज्यातील ज्या मंदिरांमध्ये लोक पुष्कळ वर्षांपासून पूजा करतात, त्या मंदिरांचा आम्हाला जीर्णोद्धार करायला आहे. हा प्रकल्प केवळ श्रीराममंदिरांपुरता मर्यादित नसून या प्रस्तावित योजनेच्या अंतर्गत इतर मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जाणार आहे.

काँग्रेससाठी देव आणि धर्म राजकारणाचा विषय नाही ! – काँग्रेस

याविषयी काँग्रेस पक्षाने पोस्ट करून म्हटले की, श्रीराम कर्नाटकातही आहे. या संदर्भात आपल्या सरकारने प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पावले उचलली आहेत. देव आणि धर्म हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. हा केवळ श्रद्धा आणि भक्ती यांच्याशी निगडित आहे.

(सौजन्य : Times Now)

हिंदुत्वावर विश्‍वास ठेणारे काँग्रेसला निवडणुकीत उत्तर देतील ! – भाजप

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार आर्. अशोक म्हणाले, ‘‘सरकारने अयोध्येच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यांना कारागृहात टाकले. त्यांचा सतत छळ होत आहे. काँग्रेसवाल्यांनी काहीही केले, तरी मतदान करणारे आणि हिंदुत्वावर विश्‍वास ठेवणारे लोक आगामी निवडणुकीत काँग्रेसला उत्तर देतील.’’

संपादकीय भूमिका

  • ‘राजकारणासाठी, मतांसाठी काँग्रेसवाले, कोटावर जानवे घालायला कमी करणार नाहीत’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काही दशकांपूर्वीच म्हटले होते. ते किती द्रष्टे होते, हे काँग्रेसच्या या निर्णयावरून पुन्हा लक्षात येते !
  • ‘श्रीराम काल्पनिक आहे’, असे म्हणणार्‍या काँग्रेसने आता कितीही आटापिटा केला, तरी ‘काँग्रेसचे श्रीरामाविषयीचे प्रेम हे पुतना मावशीप्रमाणेच आहे’, हे हिंदूंना ठाऊक आहे !
  • काँग्रेसला खरेच श्रीरामाविषयी आणि मंदिराविषयी भाव असता, तर तिने श्रीरामजन्मभूमीवर स्वतःहून मंदिर बांधून हिंदूंना दिले असते !