मुंबईत गेल्या वर्षांत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लैंगिक शोषणाचे गुन्हे नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबईत वर्ष २०२३ मध्ये दरमहा सरासरी सुमारे ५ ‘सेक्स्टॉर्शन’चे (एखाद्याची अश्‍लील छायाचित्रे ऑनलाईन प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे) गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्‍लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली. मॉर्फिंग (चेहर्‍याचे विद्रूपीकरण करून सामाजिक माध्यमांवर चित्र प्रसारित करणे) व्हिडिओ आणि छायाचित्रांचे १८३ गुन्हे नोंद झाले आहेत.

ऑनलाईन लैंगिक आणि आर्थिक शोषण कसे केले जाते ?

समाजमाध्यमे किंवा भ्रमणभाष यांवर संदेश पाठवला जातो. महिला असल्याचे भासवणारी व्यक्ती ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ करते. भ्रमणभाष क्रमांक मागणे, गोड बोलून विश्‍वास संपादन करणे, नंतर अश्‍लील संभाषण, त्यानंतर अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करणे, समोरील व्यक्तीस तसे करण्यास प्रवृत्त करणे असे केले जाते. नंतर अश्‍लील संभाषण आणि अश्‍लील व्हिडिओ हे ‘अ‍ॅप’च्या साहाय्याने एकत्र केले जातात. त्यानंतर ते समाजमाध्यमांवर किंवा यूट्यूबवर ‘अपलोड’ करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. ‘लोन अ‍ॅप’वरील कर्ज फेडल्यानंतरही हीच पद्धत वापरली जाते. ‘मॉर्फिंग’ केलेला अश्‍लील व्हिडिओ पाठवून धमकावले जाते. हे व्हिडिओ प्रसारित करण्याची भीती दाखवून पैसे उकळतात.