सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे लक्षात आणून दिल्याचे महत्त्व अन् त्यामुळे साधिकेला झालेला लाभ !

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितल्यानुसार ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय शोधून करतांना केवळ नामजप शोधून तो करणे; पण त्याचा लाभ न होणे

‘एप्रिल २०२३ पासून माझ्या मनामध्ये अनावश्यक आणि निरर्थक विचार येऊन काळजी करण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. त्यासाठी मी मानसोपचारही घेत होते. त्यानंतर जून २०२३ मध्ये पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३४ वर्षे) यांनी मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीनुसार नामजपादी उपाय’ शोधून ते २ घंटे करायला सांगितले. त्याप्रमाणे मी प्रतिदिन केवळ नामजप शोधून २ घंटे नामजप करायचे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

२. नामजप करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा न केल्याने पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा संकल्प कार्यान्वित न होणे

मी वाईट शक्तींनी निर्माण केलेले स्थान शोधून त्यावर न्यास आणि मुद्रा करत नव्हते. केवळ नामजप करत होते. त्यामुळे माझा त्रास उणावला नाही आणि माझ्याकडून परिणामकारक उपाय न झाल्याने पू. (सौ.) अश्विनीताईंचा संकल्पही कार्यान्वित होऊ शकला नाही.

सौ. समिधा संजय पालशेतकर

३. ‘मनामध्ये विचारच येतात, नामजप होत नाही’; म्हणून नामजप न करता केवळ सेवा करणे

खरे तर मला नामजपादी उपाय करायचा पुष्कळ कंटाळा यायचा. ‘मनामध्ये सतत विचारच येतात, नामजप होत नाही, तर नामजपादी उपाय कशाला करायचे ? सेवाच करूया’, असे विचार माझ्या मनात यायचे. त्यामुळे मी नामजपादी उपाय न करता सेवाच करायचे.

४. मनाची नकारात्मक स्थिती !

४ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेच्या मनः स्थितीविषयी विचारल्यावर त्यांना मनाची स्थिती सांगणे : १४.९.२०२३ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला माझ्या मनःस्थितीविषयी विचारल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्या मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.’’ त्यांना माझ्या मनाची स्थिती सांगतांना मी माझ्या मनात येत असलेले विचार त्यांना सांगितले.

४ अ १. अनावश्यक विचार करणे : दिवसभर माझ्या मनात सेवांविषयी विचार असतात. प्रत्यक्षात कुणी मला सेवा परिपूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचा अधिक आग्रह केला नाही. ‘माझ्याकडून अमुक एक सेवा वेळेत व्हायला हवी’, असेही कुणी मला सांगितले नव्हते; उलट सहसाधक मला समजून घेतात. असे असूनही माझ्या मनावर सेवेच्या विचारांचा ताण असतो.

४ अ २. नकारात्मक विचार करणे : माझ्या मनात ‘मला भावजागृतीचे प्रयत्न जमत नाहीत. माझ्याकडून श्री गुरूंना अपेक्षित अशी साधना होत नाही’, असे स्वतःविषयी नकारात्मक विचार असतात. यामुळेही माझ्या मनावर सतत ताण असतो.

४ अ ३. काळजी आणि भीती वाटणे : यजमानांच्या (श्री. संजय पालशेतकर यांच्या) संदर्भातील भूतकाळातील प्रसंग आठवून माझे मन अस्थिर होते. (एप्रिल २०२० पासून यजमान अर्धांगवायूने रुग्णाईत आहेत.) मी किंवा यजमान रुग्णाईत झाल्यावर भीती आणि काळजी यांचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे कुठलीही नवीन सेवा करतांना मनात भीती असते.

४ अ ४. प्रतिमा जोपासणे : ‘कोण काय म्हणेल ? समोरचा साधक माझ्याविषयी काय विचार करत असेल ?’, असा प्रतिमेचा विचार येऊन समोरचा साधक माझ्याविषयी काय विचार करत असेल, त्याविषयी मीच ठरवते.

५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन !

अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्थान शोधून न्यास, मुद्रा आणि नामजप करण्याविषयी विचारणे : मी माझ्या मनाची स्थिती सद्गुरु राजेंद्रदादांना सांगितल्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘नामजपादी उपाय कुठले करता ? न्यासस्थान कुठे येते ? न्यासस्थानावर परिणामकारक उपाय करता का ? मुद्रा कुठली करता ?’’ न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे महत्त्व मला ठाऊक नसल्याने मी ते करत नव्हते. त्यामुळे मी त्यांना म्हणाले, ‘‘मी न्यासस्थान शोधून मुद्रा करत नाही.’’

५ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘स्थान शोधून न्यास आणि मुद्रा का करायला हवी ?’ याचे सांगितलेले महत्त्व ! : मला ‘स्थान शोधून न्यास आणि मुद्रा का करायला हवी ?’ याचे महत्त्व समजावून सांगतांना सद्गुरु राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘वाईट शक्ती आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्या शरिरात त्रासदायक शक्तींची स्थाने निर्माण करतात. ही स्थाने शोधून त्यावर न्यास आणि मुद्रा केल्याने ती स्थाने नष्ट होतात.’’

५ इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आवरण काढण्यास शिकवून त्याचे महत्त्व सांगणे : सद्गुरु राजेंद्रदादा यांनी मला ‘दोन्ही हातांच्या तळव्यांनी देहावर आलेले त्रासदायक आवरण कसे काढायचे ?’, हे शिकवले. त्यांनी मला नामजप आणि न्यासस्थान शोधून देऊन ‘मुद्रा कुठली करायची ?’, हे सांगितले. त्यांनी मला सलग ३ दिवस नामजपादी उपाय शोधून दिले आणि एक आठवड्यासाठी उपाय करतांना प्रत्येक १० मिनिटांनी आवरण काढण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘नामजप न्यून झाला, तरी चालेल; पण आवरण काढण्यास प्राधान्य द्यावे.’’

५ ई. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला स्थान शोधून न्यास आणि मुद्रा न करण्यासाठी प्रायश्चितही घ्यायला सांगितले.

६. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्यानुसार नामजपादी उपाय केल्यामुळे जाणवलेले पालट

अ. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.

आ. नामजपादी उपाय गुणात्मक होऊन सकारात्मक विचार वाढले.

इ. सतत कृतज्ञता व्यक्त होऊन उपाय भावपूर्ण होऊ लागले.

ई. त्यानंतर श्री गणेशचतुर्थीसाठी घरी गेल्यावरही माझ्या मनावर ताण नव्हता. अनावश्यक विचारांचे प्रमाण पुष्कळच न्यून झाले होते.

७. परिणामकारक उपाय करण्याचे महत्त्व लक्षात येणे

आरंभी ४ मास मी केवळ नामजप करत राहिल्याने मला होणारा मानसिक त्रास न्यून होत नव्हता; पण केवळ काही दिवसच आवरण काढून, न्यासाचे स्थान शोधून, न्यास आणि मुद्रा करून परिणामकारक उपाय केल्याने संतांचा संकल्प कार्यान्वित झाला आणि मला त्याचा लाभ झाला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्या कृपेने ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीनुसार स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून नामजपादी उपाय करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

८. ‘इतर साधकांनाही नामजपादी उपाय परिणामकारक कसे करायचे ?’, ते समजावे’, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी याविषयी लेख लिहून द्यायला सांगणे

बरेच साधक नामजपादी उपाय करतांना न्यास आणि मुद्रा करणे टाळतात. त्यामुळे परिणामकारक उपाय न झाल्यामुळे साधकांचे त्रास उणावत नाहीत. सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘जे साधक नामजपादी उपायांच्या वेळी न्यास आणि मुद्रा करत नाहीत, त्या साधकांना त्याचे महत्त्व लक्षात येण्यासाठी, हा लेख लिहून द्या.’’ त्यांनी मला ‘हे लिखाण कशा प्रकारे लिहून दिले, तर साधकांना त्याचा लाभ होईल’, यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मला हा लेख परिपूर्ण होण्यासाठी सर्व सूत्रेही सांगितली.

९. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत’, यासाठी मी आपल्या चरणी क्षमायाचना करते. ‘आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून होत नसतांनाही आपले माझ्याकडे सतत लक्ष आहे’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी ‘नामजपादी उपाय परिणामकारक कसे करायला हवेत ?’, ते प्रत्यक्ष शिकवले आणि वेळोवेळी साहाय्य करून हा लेख लिहून देण्यासाठी मार्गदर्शनही केले’, यासाठी मी त्यांच्याही चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. समिधा संजय पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१०.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक