श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग ६)
एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे. अयोध्यानगरीसह भोवतालचा १०० किलोमीटरचा परिसर श्रीराममय झाला आहे…! रामायणातील विविध प्रसंग चित्ररूपाने अयोध्येत जागोजागी रेखाटण्यात आले आहेत. धनुष्य-बाण, पादुका यांच्या आकृत्या जिथे दृष्टी जाईल तिथे दृष्टीस पडत आहेत ! देशाच्या विविध भागांतून रामभक्तांची मांदियाळी मंदिरस्थळी येत आहे. कुणी सहस्रो किलोमीटरचा प्रवास पायी करून श्रीरामनगरीत पोचले आहेत, तर कुणी सायकलवरून आले आहेत. श्रीरामासाठी आणि रामभक्तांसाठी कुणी २०० किलोचा लाडू आणला आहे, तर कुणी नैवेद्यासाठी ५६ भोग घेऊन आले आहेत. देहभान विसरून जो तो श्रीरामनामसंकीर्तनात लीन झाला आहे. कुणी भक्तांच्या मार्गात रांगोळ्या रेखाटत आहे, तर कुणी ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांचे सडे घालत आहे. अयोध्यानगरीत येणारा प्रत्येक जण रामभक्तीत न्हाऊन निघत आहे…! तेथील पोलीसही याला अपवाद नाहीत !
भविष्यात भारताचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा २२ जानेवारी २०२४ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ! आजच्या पिढीला जे भाग्य लाभते आहे, ते मागील ६-७ पिढ्यांच्या नशिबी नव्हते. श्रीराममंदिर उभारणीसाठीच्या संघर्षात कित्येकांचे पुत्र, भाऊ, पती होते. या सर्वांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील सदस्य श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी त्यागला आहे. या समस्त त्यागमूर्तींना श्रीराममंदिर उद्घाटनाच्या समारोहासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्या वेळी काळजावर दगड ठेवून सोसलेल्या अतीव दुःखाचे आज परमोच्च आनंदात रूपांतर होतांना पाहून त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला आहे…! अयोध्येत वार्ताहर या त्यागमूर्तींशी संवाद साधत असतांना त्यांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला. ज्या भूमीवर आपल्या काळजाच्या तुकड्याने प्राण त्यागले, त्या भूमीवर आज भव्य दिव्य राममंदिर होतांना पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलतांना पहायला मिळत आहे.
या परमपावन दिनी श्रीरामांचे अस्तित्व अनुभवण्यासाठी प्रत्येक जण त्याच्या परीने काही ना काही प्रयत्न करत आहे. आज श्रीरामासाठी हिंदु समाज एकवटला आहे. ही एकजूट त्याने कायम ठेवणे आवश्यक आहे. श्रीरामजन्मभूमीत श्रीराम विराजमान झाले; मात्र त्यानंतर ‘श्रीरामांना अपेक्षित रामराज्य आणण्याचे दायित्व त्यांच्यासाठी एकवटलेल्या हिंदूच्या खांद्यावर असेल’, याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. धर्मसंस्थापनेच्या कार्यात रामरायाचा आशीर्वाद असणारच आहे; परंतु सर्वसक्षम श्रीकृष्णाने जेव्हा करंगळीवर गोवर्धनपर्वत उचलला, तेव्हा गोपगोपिकांनी त्यांच्या काठ्या पर्वताला लावल्या होत्या. असे करणे, ही त्यांची साधना होती ! अगदी त्याच प्रकारे प्रत्येक हिंदूने रामराज्याच्या स्थापनेसाठी भक्ती करणे, राष्ट्र आणि धर्म कार्य करणे आवश्यक आहे. ही साधना करतंना दोषांचे निवारण आणि गुणांचे संवर्धन करावे लागेल. त्याच वेळी समाजपुरुषातील दोषांचे निवारण करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. स्वतःची आंतरिक शुद्धी आणि भक्ती करून समजपुरुषाला घडवावे लागेल. हे करण्यासाठी एकत्र झालेल्या हिंदूंनी सर्वार्थाने झोकून दिले, तर रामराज्याची पहाट दूर रहाणार नाही !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई