आज हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने…

१. ११ वा रुद्र
हनुमान हा ११ वा रुद्र असून तो शिवस्वरूप आहे. त्रेतायुगात प्रभु श्रीरामाच्या अवतारी कार्यात सहभागी होऊन श्रीरामाला साहाय्य करण्यासाठीच शिवाने हनुमंताचा अवतार धारण केला होता.
२. सप्तचिरंजिवांपैकी एक
बळीराजा, परशुराम, हनुमान, बिभीषण, महर्षि व्यास, कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव आहेत.

३. पवनसुत हनुमान
हनुमंतामध्ये वायूतत्त्व प्रबळ आहे. वायुदेवाने शिवाचा तेजांश अंजनीदेवीपर्यंत पोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्यामुळे हनुमंताला ‘पवनसुत’ किंवा ‘पवनपुत्र’ असेही संबोधले जाते. वायुदेवाच्या कृपेमुळे हनुमंत गगनात उड्डाण करून मुक्तपणे संचार करू शकतो. हनुमंताचे कार्य वायूतत्त्वाशी संबंधित आहे. संस्कृतमध्ये ‘मरुत्’ चा अर्थ ‘वायु’ आहे. हनुमानाचा संबंध वायुशी असल्यामुळे त्याला ‘मारुति’ म्हणतात.
४. तेजतत्त्वावर नियंत्रण असल्यामुळे सूर्य आणि अग्नी यांपासून संरक्षण प्राप्त होणे
हनुमान वायूतत्त्वाच्या बळावर कार्य करत असल्याने आणि वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे हनुमानाचे तेजतत्त्वावर नियंत्रण आहे. त्यामुळे हनुमंताला सूर्य आणि अग्नी यांपासून संरक्षण प्राप्त झाले. हनुमानाने बाल्यावस्थेत उगवत्या सूर्याला आकाशातील लाल रंगाचे फळ समजून गिळंकृत करायला गेला होता. लंकादहनाच्या प्रसंगी हनुमंताच्या शेपटीला आग लागलेली असतांनाही त्याला थोडीही इजा झाली नाही. उलट शेपटीच्या शेंडीला लागलेल्या आगीचा उपयोग करून हनुमंताने संपूर्ण लंकेचे दहन केले. यावरून तेजतत्त्व, म्हणजे अग्नीतत्त्व हनुमानाच्या अधीन आहे, हे सिद्ध होते.
५. शिवाप्रमाणे अखंड साधना करणारा रामभक्त हनुमान
हनुमान शिवाप्रमाणे अखंड साधना करतो. तो युद्धाच्या प्रसंगी, तसेच झोपेतही रामनामाचा अखंड जप करतो. त्याचप्रमाणे जागृत स्थितीत असतांना त्याचे कार्य पूर्ण होताच तो रामाचे ध्यान करतो. अखंड रामनाम घेणारा हा एकमात्र रामभक्त आहे.
६. दास्यभक्तीचे सर्वाेत्तम उदाहरण
भक्तीयोगांतर्गत श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्ती आहेत. यांतील दास्यभक्तीचे हनुमान सर्वाेत्तम उदाहरण आहे.
७. काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केलेला असणे
हनुमान सप्तचिरंजिवांपैकी एक असून तो कल्पांतापर्यंत जिवंत रहाणार आहे. त्यामुळे काळ त्याच्या अधीन आहे. हनुमान बालब्रह्मचारी असून तो ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करतो. हनुमानाने षड्रिपूंतील सर्वांत बलवान असणार्या कामवासनेवर विजय प्राप्त केलेला आहे.
८. संन्यास आश्रमाचे पालन करणे आणि विरक्त जीवन जगणे
हनुमान जरी कल्पांतापर्यंत जिवंत रहाणार असला, तरी त्याचे मन अजिबात मायेत गुंतत नाही. तो मोहमायेपासून अलिप्त राहून विरक्त जीवन जगतो. तो नैष्ठिक ब्रह्मचारी असून संन्यास आश्रमाचे पालन करतो. तो शिवाप्रमाणे परम वैरागी आहे.
९. धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थांचा दाता असणे
हनुमान दास्यभक्ती करत सेवक धर्माचे आचरण करतो. तो जीवनमुक्त असून त्याने मोक्षप्राप्ती केलेली आहे. त्याच्या उपासनेमुळे भक्तांना धर्मशक्ती प्राप्त होते आणि मोक्ष मिळतो; कारण तो धर्म अन् मोक्ष या पुरुषार्थांचा दाता आहे.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.