
मारुतिरायांप्रमाणे आपल्या सर्वांनाही त्यांच्यासारखी प्रभु श्रीरामांप्रती असणारी ‘दास्यभक्ती’ करावी, असे वाटते. त्यांच्या दास्यभक्तीचे स्मरण केल्यास किंवा त्या संदर्भातील कथा ऐकल्यास आपलाही लगेच भाव जागृत होतो. हनुमंत एवढे बलशाली असूनही विनम्र आणि अखंड श्रीराम नामाचे गुणगान करतात. आपल्या सर्वांना त्यांच्यातील ‘निस्सीम दास्यभक्ती’विषयी ठाऊकच आहे; परंतु त्यांची प्रभु श्रीरामांप्रती असणारी ‘नादभक्ती’ कशी होती ? ते समजून घेऊ.

मारुतिरायांकडे एक वीणा होती. त्यांच्या हातात ‘चिपळ्या’ असणारी काही चित्रे आपणही पाहिली असतील. वीणा वाजवत ते प्रभु श्रीरामांची महती गात. त्यामुळे त्यांच्यासहित इतरांचीही भावजागृती व्हायची आणि प्रभु श्रीरामांनाही ते पुष्कळ आवडत असे. श्रीरामही त्यांचे वादन ऐकण्यास आतूर असायचे. हनुमंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जपही वीणेवर वाजवत. ते प्रभु श्रीरामचंद्रांची अखंड भक्ती करत. एकदा देवर्षि नारद यांच्या मनात ‘हनुमानाच्या या नादभक्तीची परीक्षा घ्यावी’, असा विचार आला. नारदमुनी कैलास पर्वतावर पोचले. तेव्हा भगवान शिव श्रीरामांना भजत त्यांच्या स्वतःकडे असणार्या वीणेवर गुणगान करणारे गीत वाजवू लागले. त्याच वेळी मारुतिराया कैलास पर्वतावर पोचले आणि डोळे मिटून त्यांची वीणा घेऊन महादेवांसमवेत तेही प्रभु श्रीरामांचे गुणगान गाऊ लागले. तेव्हा मारुतिराया इतके तल्लीन झाले की, त्यांचे वीणेवरचे हात थांबून केवळ डोळ्यांतून भावाश्रूच तरळू लागले. त्यांची ही अत्युच्च भक्ती पाहून भगवान शिवही त्यांच्यावर प्रसन्न झाले अन् त्यांना म्हणाले, ‘तू सर्वश्रेष्ठ भक्त आहेस आणि तुझी ही भक्ती अनंत काळापर्यंत सर्वत्र प्रसिद्ध होईल !’
या कथेतून लक्षात आले, ‘प्रभु श्रीरामांचे गुणगान करण्यासाठी हनुमानाने वीणा या वाद्याला साधन बनवले आणि भक्तीची परमोच्च अवस्था गाठली. ‘हनुमंताची पराकोटीची रामभक्ती आणि वीणेचा परमदिव्य नाद’ हे किती अद्वितीय, अत्युच्च स्तरावरचे संयोजन आहे. आपण संगीत क्षेत्रातील असू, तर आपल्याकडेही देवाने गायन, वादन अथवा नृत्याची कला दिली आहे, तर आपणही आपल्या कलेतून अशी दिव्य भावावस्था अनुभवू शकतो. ‘आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत कलांमध्ये खरच ईश्वराची अनुभूती घेण्याची शक्ती आहे’, हे कथेतून लक्षात येते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘हे हनुमंता, तूच आम्हा सर्व कलाकार साधकांमध्ये तुझ्यासारखी उत्कट दास्यभक्तीमय ‘नादभक्ती’ निर्माण कर. हे पवनसुता, या नादभक्तीद्वारे आम्हाला श्रीरामाचे असेच गुणगान करून आम्हालाही श्रीराममय होता येऊ दे. तूच आमच्यावर कृपा कर !’
– कु. अपाला औंधकर, फोंडा, गोवा.