स्वामी विवेकानंद यांनी भक्तीविषयी सांगितलेली सूत्रे

स्वामी विवेकानंद

थोर आचार्यांनी भक्तीविषयी म्हटले आहे,

१. भक्ती ही ज्ञान, कर्म आणि योग (राजयोग) या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे; कारण भक्ती हेच तिचे फल होय. भक्ती ही साधन आणि साध्य दोन्ही आहेत.

२. मनुष्य केवळ अन्न पाहून वा अन्नाविषयी माहिती मिळवून स्वतःची भूक शमवू शकत नाही. त्याचप्रमाणे ईश्वरविषयक ज्ञानाने वा ईश्वराच्या दर्शनानेही जोवर त्याला भक्ती प्राप्त होत नाही, तोवर समाधान होत नाही; म्हणून भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे.

३. ज्याला भक्ती हवी असेल, त्याने इंद्रिय सुखांचा त्याग केला पाहिजे आणि लोकांचा संपर्कही टाळला पाहिजे.

४. अहर्निश त्याने भक्तीचा ध्यास घेतला पाहिजे, अन्य कशाचा नाही.

५. जेथे ईश्वराचे भजन वा कीर्तन चालू असेल, तेथे त्याने जावे.

६. भक्तीचे प्रमुख साधन, म्हणजे मुक्त झालेल्या महापुरुषाची कृपा हे होय.

७. महापुरुषाची संगती दुर्लभ आहे. तिने जीवाचा निश्चित उद्धार होतो.

८. ईश्वराच्या कृपेनेच असे गुरु लाभत असतात.

९. ईश्वर आणि त्याचे भक्त यांत भेद नसतो; म्हणून महापुरुषांचा संग लाभण्यासाठी यत्नशील रहा.

१०. दुर्जनांची संगती नेहमी टाळली पाहिजे; कारण तिच्यामुळे काम, क्रोध, मोह हे उत्पन्न होतात. ध्येय विस्मृती होते, इच्छाशक्तीचा नाश होतो, तसेच चिकाटीसह सर्व काही नष्ट होते.

११. हे विकार प्रथम तरंगाप्रमाणे लहान असतात; पण नंतर वाईट संगतीने ते समुद्राप्रमाणे प्रचंड रूप धारण करतात.

१२. जो अनासक्त असतो, जो महापुरुषांची सेवा करतो, जो एकाकी रहातो, जो जगाचे सर्व बंध तोडून टाकतो, जो त्रिगुणातीत होतो, जो चरितार्थाकरताही ईश्वरावरच अवलंबून रहातो, तो माया तरून जातो.

१३. जो सर्व कर्मफलांचा त्याग करतो, जो सर्व कर्मांचा आणि सुख-दुःखादी द्वंद्वांचा त्याग करतो, जो शास्त्रांचाही त्याग करतो, त्याला अखंड भक्ती लाभ होतो. तो ही भवनदी तरून जातो आणि अन्यांना ती तरून जाण्यास साहाय्य करतो.

– स्वामी विवेकानंद

(साभार : ग्रंथ ‘धर्माचे स्वरूप आणि साधन’)