आदर्श कुणाचा ठेवावा ?

छत्रपती शिवाजी महाराज

तरुण पिढी सध्याचे अभिनेते, अभिनेत्री यांना ‘आदर्श’ मानते; पण ‘ही मंडळी खरोखरच आदर्श असतात का ?’, याचा विचार करायला हवा. या अनुषंगाने एक उदाहरण पाहूया. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला, ‘‘तू ‘ब्रेकअप’ (मित्रासमवेतचे नातेसंबंध तुटणे) झाल्यास त्यातून कशी बाहेर पडतेस ?’’ त्यावर ती अभिनेत्री म्हणाली, ‘‘मी स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन पुष्कळ रडते. आईस्क्रीम खाते. एकांतात रडायला मला आवडते. नातेसंबंध तुटले, तरी त्यातून आरामात बाहेर पडायचे. घाई करायची नाही.’’ ‘एखादा मित्र किंवा मैत्रीण यांच्यासमवेत नाते निर्माण होणे आणि ते तुटणे’, ही आता सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे. चित्रपट कलाकारांचे अनुकरण हे अनेक गोष्टींत होते. त्यामुळे तिने असे केले, म्हणजे तरुणांमध्ये याही गोष्टीचे अनुकरण होणार, हे ओघाने येते. का ? तर ही अभिनेत्री त्यांची ‘आदर्श’ आहे. आजच्या तरुण पिढीला अशा कलाकारांविषयी प्रौढी वाटते. मग तेही असे नातेसंबंध निर्माण करतात आणि नंतर ते तुटल्यावर वरील प्रकारे व्यक्त होतात; कारण आदर्शच अयोग्य स्वरूपाचा घेतलेला असतो. चित्रपट कलाकार बक्कळ पैसा कमावतात. गाडी, बंगला, उंची कपडे, दागिने, प्रसिद्धी, छायाचित्रे या विश्वात ते सतत वावरतात. सर्व सुखे त्यांच्या पायांशी लोळण घेत असतात. नात्यांच्या विश्वात हवे तेव्हा अडकायचे आणि वाटेल तेव्हा त्यातून बाहेर पडायचे, असे त्यांचे पाश्चात्त्यीकरण झालेले असते.

एखादे नाते निर्माण झाल्यावर ते आयुष्यभरासाठी टिकवतांना केलेले परिश्रम, त्यासाठी केलेला सर्व प्रकारचा त्याग, स्वतःचे नैतिक दायित्व, कर्तव्ये यांची जाण असली, तर नाते तुटण्याची शक्यता नसते. ‘नाते न तोडता त्यागाची आणि प्रेमाची जाणीव ठेवून जुळवून घ्यायचे आहे’, हा संस्कार तरुणांवर करायला सध्या कुणी नाही. कलाकारांच्या विश्वाला आदर्श मानून आयुष्याची हानी करून घेण्यापेक्षा आयुष्याचे वास्तव जाणले पाहिजे. आयुष्याचे मोल जाणून योग्य संस्कारांचे आदर्श समोर ठेवले पाहिजेत. आदर्श कुणाचा घ्यावा ? पराभूत आणि नकारात्मक मानसिकतेत जाणार्‍यांचा कि सकारात्मक राहून आयुष्याच्या यशोशिखरावर पोचणार्‍यांचा ? देशाशी कसलेही देणे-घेणे नसणार्‍यांचा कि खर्‍या अर्थाने राष्ट्रोत्कर्षासाठी प्रयत्न करणार्‍यांचा ? आपल्या देशाला ऋषिमुनी, संत, क्रांतीकारक, राष्ट्रपुरुष, विद्वान, तत्त्वज्ञ, सैनिक यांचा समृद्ध वारसा आहे. त्यांच्यापैकी एखाद्याचा आदर्श तरुणांनी घेतल्यास जीवनाचे सार्थक होईल !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.