Contempt Of High Court : गोवा – समुद्रकिनारपट्टीवर पार्ट्यांच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण

उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर !

पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने पार्ट्यांमध्ये होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देऊनही हणजूण आणि आसपासच्या किनारपट्टी परिसरात बहुतांश भागांमध्ये रात्रीच्या वेळी होत असलेल्या पार्ट्यांमध्ये ध्वनीप्रदूषण होत आहे. गेला आठवडाभर हा प्रकार चालू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हडफडे येथील डोंगरावर सध्या विशेष पार्ट्या चालू आहेत. या ठिकाणी नोव्हेंबरपासून पार्ट्या चालू आहेत. येथील ‘टॉय’ मैदानातही पार्ट्या चालू आहेत. या भागांमध्ये काही पार्ट्या दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत चालत असून याला आडकाठी आणायला गेलेल्या तरुणांवर आक्रमण करण्यात आले. हणजूण पोलीस ध्वनीप्रदूषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिकांची रात्रीची झोप उडाली आहे. पार्ट्यांमधील कानाचे पडदे फाटू शकणारे कर्कश संगीताचे प्रतिध्वनी कित्येक मैल ऐकू येतात; मात्र हे प्रतिध्वनी (आवाज) पोलिसांना कसे ऐकू येत नाहीत ? याविरोधात पोलीस, पर्यावरण खाते आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी नोंदवूनही हे प्रकार थांबलेले नाहीत.

पोलीस अधिकारी आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकार्‍यांनी पार्ट्यांमध्ये ध्वनीप्रदूषण होत असल्याचे नाकारले आहे. पोलिसांच्या मते पोलीस अधिकारी घटनास्थळी फिरत असून ते परिस्थितीवर देखरेख ठेवतात, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या मते मंडळाचे अधिकारी पार्ट्या चालू असलेल्या ठिकाणी रात्री १० वाजता संगीत रजनी बंद होईल याची दक्षता घेत आहेत.