संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. तेलंगाणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव करून काँग्रेस सत्ता हस्तगत करणार आहे. ‘४ राज्यांमधील निवडणुका म्हणजे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे’, असे म्हटले जात होते. त्यामुळे हे निकाल भाजपला सुखावणारे आहेत. निकालांच्या आधी घेतलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये ‘राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजप अन् काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होऊन कुणालाही बहुमत मिळणार नाही’, असा अंदाज बांधण्यात आला होता; मात्र या दोन्ही राज्यांत हाती आलेल्या निकालांत वेगळेच चित्र दिसून आले. यामुळे लोकांनी भाजपवर विश्वास टाकला, असे म्हणण्यास वाव आहे.

सामान्य जनतेची मते निर्णायक !

भाजप ज्या राज्यांमध्ये विजयी झाला, त्या राज्यांमधील सामान्य जनता आणि महिला यांनी भाजपला पसंती दिली. मध्यप्रदेशमध्ये महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या ‘लाडली बहना’ यांसारख्या योजनांमुळे महिला वर्ग भाजपच्या कार्यकाळाविषयी समाधानी होता. भाजपच्या घोषणापत्रामध्ये पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांना आणखी सुविधा देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेचाही भाजपला लाभ झाला. राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही काहीसे असेच चित्र आहे. छत्तीसगडमध्ये बस्तरसारख्या आदिवासीबहुल भागांतील आदिवासींची मते भाजपच्या पारड्यात पडली. मागील निवडणुकीच्या वेळी याच भागामध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. या वेळी आदिवासींनी भाजपवर विश्वास टाकल्यामुळे ‘भाजपला केवळ शहरी भागांतील लोकांची मते मिळतात’, हा अंदाज फोल ठरला. एका अहवालानुसार राजस्थानमध्ये ८२ टक्के मुसलमानांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. या राज्यात ६२ टक्के सामान्य लोक मात्र भाजपच्या बाजूने उभे राहिले. केंद्रात, तसेच भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये विविध योजनांद्वारे मुसलमानांवर खैरात केली जाते; मात्र राजस्थान काय किंवा अन्य निवडणुकींमधील मतदानाच्या टक्केवारीवरून भारतातील बहुतांश मुसलमान भाजपच्या बाजूने कधीच उभे रहात नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जाती-पातींची भिंत छेदून जेव्हा हिंदु मतदान करतो, त्या वेळी त्याची एकगठ्ठा मते ही भाजपलाच मिळतात. त्यामुळे भविष्यात हिंदूंचा जो उत्कर्ष साधेल, त्यांच्यासाठी काम करील, तोच पक्ष सत्तेत असेल.

नेतृत्वाची कसोटी !

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार

या वेळीही विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घ्यावा लागला. ३ राज्यांमध्ये त्याचा भाजपला लाभही झाला; मात्र त्यासह स्थानिक नेतृत्वाचे महत्त्वही येथे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या रूपाने एक चेहरा भाजपला लाभला. केंद्र आणि राज्य स्तरांवर विविध योजना त्यांनी चांगल्या प्रकारे राबवल्या. त्यामुळे राज्यात भाजपचा विजय निश्चित होता. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे सिंदिया यांचे नाव घेतले जात होते. त्या राजघराण्यातील आहेत; मात्र ‘मुख्यमंत्रीपदासाठी त्या कितपत सक्षम आहेत’, याविषयी साशंकता आहे. छत्तीसगडमध्ये पूर्व मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. राजस्थानमध्ये भाजपला स्थानिक नेतृत्व लाभलेले नाही. राज्यस्तरीय निवडणुकीमध्ये राज्याच्या समस्या आणि सूत्रे हाताळली जातात. ‘त्या सोडवण्यासाठी राज्याला सक्षम नेतृत्व असावे’, अशी सामान्य जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे जेथे सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे, तेथे भाजपचा विजय निश्चित आहे. उत्तरप्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या मागे स्थानिक नेतृत्व आहे. कर्नाटकमध्ये भाजपकडे स्थानिक नेतृत्व नव्हते. त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसला होता. पुढील काळामध्ये नेतृत्व विकास करणे, ही भाजपसमोर कसोटी असेल; कारण प्रत्येक निवडणूक ही मोदी यांच्या चेहर्‍यावर जिंकू शकत नाही, हे भाजपने समजून घ्यायला हवे.

तेलंगाणाचे भवितव्य !

तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रेवंत रेड्डी या दोंघाचा पराभव करुन भाजपचे वेंकट रमण रेड्डी जायंट किलर झाले !

तेलंगाणामध्ये लोकांनी भारतीय राष्ट्र समितीला झिडकारून काँग्रेसला कवटाळले. मुख्यमंत्री राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. लोक त्यांच्या सत्तेला कंटाळले होते. राव यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी सोडली नाही. हाच कित्ता काँग्रेसनेही भविष्यात चालू ठेवला, तर आश्चर्य वाटायला नको. ‘तेथील सामान्य जनतेने भारतीय राष्ट्र समितीला पर्याय म्हणून भाजपला न निवडता काँग्रेसला का निवडले ?’, याचे आत्मपरीक्षण भाजपने करायला हवे. दक्षिण भारतात जम बसवण्यासाठी भाजप प्रयत्नरत आहे. मागील निवडणुकीत भाजपला कर्नाटक गमवावे लागले. तेलंगाणामध्ये भाजपने फार मोठी कामगिरी केलेली नाही. जमेची गोष्ट म्हणजे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांनी निवडणूक जिंकली आहे. ‘हिंदुत्वासाठी सचोटीने कार्य करणार्‍यांच्या मागे सामान्य हिंदु उभा रहातो’, हेच यातून दिसून आले. भाजपने स्थानिक स्तरावर हिंदूसंघटन आणि स्थानिक नेतृत्व विकास केला असता, तर तेलंगाणाचे चित्रही वेगळे असते.

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगड हे दोन मोठे गड गमावले आहेत. याविषयी आता काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाडण्यास आरंभ झाला आहे. काँग्रेसचे नेते ‘पक्षाची पिछेहाट कशामुळे होत आहे’, याविषयी अंतर्मुख होऊन विचार करतील, अशी सध्या तरी स्थिती नाही. ‘या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे. भाजपने ते लक्षात घेऊन लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करावी, अशीच लोकांची अपेक्षा आहे.

२ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ?