परळी वैद्यनाथ (जिल्हा बीड), ३० नोव्हेंबर (वार्ता.) – ‘धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान’ संचलित ‘वैद्यनाथ भक्ती मंडळा’च्या वतीने येथील औद्योगिक वसाहत सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. २६ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात ‘हरे कृष्णा’ (इस्कॉन) यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभु श्रीराम, प्रभु वैद्यनाथ, श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे, तसेच भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. यासमेवत २६ नोव्हेंबरच्या आतंकवादी आक्रमणातील वीरगती प्राप्त झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या स्थापनेस २ वर्षे पूर्ण होत असल्याविषयी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१. या कार्यक्रमाला शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यनाथ भक्ती मंडळाचे सेवेकरी प्राध्यापक अतुल दुबे यांनी प्रास्ताविकात भक्ती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या कामकाजाची माहिती दिली.
या वेळी अतुल दुबे म्हणाले, ‘‘१३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी वैद्यनाथ भक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून देवभूमी असलेल्या परळी पंचक्रोशीतील मंदिरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी, हरिहर तीर्थ, मार्कंडेश्वर तीर्थ, गोशाळा आदींची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यासमवेत गोशाळेला चारा, रेल्वेस्थानकाची स्वच्छता हेही उपक्रम राबवण्यात आले. प्रत्येक सुटीच्या दिवशी भक्ती मंडळाच्या सदस्यांच्या वतीने शहरात सामाजिक आणि धार्मिक उपक्रम हाती घेतले जातात.’’
२. विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, भक्ती मंडळाचे सेवेकरी अधिवक्ता राजेश्वरराव देशमुख यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दिनेश लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.