सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

‘पुष्कळ वर्षे साधना करूनही प्रगती न झालेल्या काही साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा सत्संग लाभला. त्यांनी त्या साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

(भाग १)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. मनमोकळेपणाने वागण्याचे महत्त्व

१ अ. मन जेवढे रिकामे राहील, तेवढे देवाशी अनुसंधान अधिक रहाणे : आपल्यातील ‘अपेक्षा, परिस्थिती न स्वीकारणे, निष्कर्ष काढणे’ इत्यादी दोषांमुळे बर्‍याचदा एखाद्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. त्या प्रसंगाविषयी अतिविचार केला जातो. मनातल्या मनात युक्तीवाद केले जातात. अशा प्रसंगी कुणाशी तरी बोलून किंवा देवाला आत्मनिवेदन करून मन मोकळे करावे. मन जेवढे रिकामे राहील, तेवढे देवाशी अनुसंधान अधिक रहाते. ‘आपले मन सतत देवाच्या विचारांत कसे राहील ?’, याकडे आपण लक्ष द्यावे आणि बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. देवाच्या प्रवाहात आपण वहात रहायला हवे. कितीही अडथळे आले, तरी चिकाटीने वाटचाल करत रहायला हवी.

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकच शब्द ३ दिवस परत परत विचारणे आणि यातून परिपूर्ण सेवा करण्यासाठी ‘मी परत कसे विचारू ?’, असा संकोच न बाळगण्यास त्यांनी शिकवणे : एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या) बाजूला बसले होते आणि त्यांनी मला ‘एक शब्द कसा लिहायचा ?’, हे विचारले. मी त्यांना तो शब्द सांगितला. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशीही त्यांनी मला तोच शब्द विचारला आणि नंतर म्हणाले, ‘‘मी तुम्हाला परत परत विचारत आहे ना !’’ यावरून ‘एखादे सूत्र कळले नाही, तर परत परत मोकळेपणाने विचारावे’, हे त्यांना शिकवायचे होते. ‘मी परत परत कसे विचारू ?’, असा संकोच मनात बाळगू नये. स्वतःची प्रतिमा जपू नये. आपल्याला व्यवस्थित समजले नाही, तर आपल्याकडून सेवेत चुका होतात. सेवा करतांना सहसाधकांनाही विचारावे; कारण सगळ्यांची बुद्धी आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सगळ्यांनी मिळून केले, तर सेवेची फलनिष्पत्ती उत्तम मिळते.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कुठलीही कृती करतांना इतरांनाही विचारणे; कारण मोकळेपणामुळे परिपूर्ण सेवा होण्यासमवेतच अहंही न्यून होत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कुठलीही कृती करतांना इतरांनाही विचारतात. इतरांकडून आपल्याला त्या कृतीविषयी आणखी समजते. त्यातून परिपूर्ण सेवा होते, तसेच त्यातून अहंही न्यून होतो. ते जर असे विचारतात, तर आपण का विचारत नाही ? एकदा त्यांनी मला एकच शब्द तीनदा विचारला. इतके ते मोकळेपणाने विचारतात. आपणही मोकळ्या मनाने रहायला हवे.

१ ई. मोकळेपणाने बोलण्याची कृती होण्यासाठी मनावर संस्कार होणे आवश्यक असणे आणि स्वयंसूचना दिल्यास अंतर्मनाला त्याची जाणीव होणे

प्रश्न : मोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व ठाऊक आहे. मोकळेपणाने न बोलण्याने होणारे तोटेही अनुभवले आहेत. कुणी मोकळेपणाने बोलायला सांगितले की, वाटते ‘आपण आता तसे बोलावे’; पण कृती होत नाही.

सद्गुरु डॉ. गाडगीळ : मोकळेपणाने बोलण्याचा संस्कार मनावर होण्यासाठी सतत प्रयत्नच करायला हवा. ‘मोकळेपणाने बोलायला हवे’, हे बुद्धीला कळलेले असते; परंतु त्याचा संस्कार अंतर्मनावर झालेला नसल्याने कृती होत नाही. त्यासाठी अंतर्मनाला स्वयंसूचना द्यावी. आंतरिक प्रगती व्हायला हवी.

२. भाव कसा वाढवावा ?

अ. कोणतीही कृती किंवा सेवा करतांना ‘देव सुचवतो’, असा भाव ठेवावा.
आ. प्रत्येक कृती करतांना ‘ती देवाशी कशी जोडू शकतो ?’, हे पहावे.
इ. देवाशी जवळीक हवी. यासाठी प्रत्येक सेवा करतांना त्याला हाक मारावी. त्याला सांगून प्रत्येक कृती करावी.
ई. महाप्रसाद घेतांना प्रत्येक घासागणिक प्रार्थना करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अनुसंधान वाढेल.
उ. सातत्याने प्रार्थना करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावजागृती होईल.
ऊ. ‘देवानेच सर्व केले’, असा भाव सातत्याने ठेवावा.
ए. स्वतःमध्ये शरणागतभाव जागृत होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत.
ऐ. मन रिकामे न ठेवता भावात रमवावे. प्रत्येक ३० मिनिटांनी केलेल्या कृतींचा आढावा घ्यावा.

३. अंतर्मनाची साधना वाढण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयीची सूत्रे

३ अ. कर्तेपणा न्यून करण्यासाठी करावयाचे प्रयत्न

१. ‘देव मला किती साहाय्य करतो. तोच सगळे करून घेतो’, असा कृतज्ञताभाव असायला हवा.
२. एखादा निर्णय घेणे जमत नसेल, तेव्हा त्याविषयी देवाला विचारावे. त्या वेळी पहिले उत्तर येते, ते योग्य असते. देवाला श्रद्धेने प्रश्न विचारला, तर देव उत्तर देतोच. जर देवाने उत्तर दिले नाही, तर समवेतच्या साधकाला विचारावे. त्याच्यातही देव आहेच !

३ आ. मनाचा त्याग होतो का ? याकडे लक्ष देणे : ‘सेवा करतांना मनाचा त्याग होतो का ?’, याकडे लक्ष असायला हवे. आपण बोलतांना, तसेच कोणतीही कृती करतांना सतत स्वतःवर लक्ष ठेवावे. मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया आणि अपेक्षा यांची नोंद करावी अन् त्या न उमटण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे हळूहळू मन निर्मळ होत जाईल.

३ इ. मन चंचल असल्याने साधनेसाठी वारंवार प्रयत्न करावे लागणे आणि प्रयत्न करतांना देवाने साहाय्य करणे : आपल्याला साधना करायची असते; पण मन चंचल असल्याने साधना सहजतेने साध्य होत नाही. त्यासाठी प्रयत्नच करायला पाहिजेत. मी वर्ष २००५ मध्ये श्वासाला नामजप जोडण्याच्या प्रयत्नांना आरंभ केला. मी देवाला परत परत प्रार्थना करायचो, ‘मला नाम श्वासाशी जोडणे जमू दे.’ स्वतःला चिमटा काढायचो. ते साध्य होण्यासाठी मला १ वर्ष लागले.

३ ई. भावस्थिती टिकून रहाण्यासाठी कृतज्ञताभाव वाढवल्यास सतत अनुसंधानात रहाता येऊन अंतर्मनाची साधना होणे

प्रश्न : सेवा आरंभ करण्यापूर्वी किंवा सेवेच्या पहिल्या टप्प्यात मला भाव अनुभवता येतो; परंतु एकदा बुद्धीने बिनचूक सेवा करण्याचा विचार आला की, नंतर बुद्धी कार्यरत होते आणि अनुसंधान टिकत नाही. यासाठी काय करावे ?

सद्गुरु डॉ. गाडगीळ : सेवा करतांनाही भावस्थिती टिकवून ठेवता येते. तुम्ही देवाशी अनुसंधान टिकवून ठेवण्यासाठी कृतज्ञताभाव वाढवा. देवाचे साहाय्य घ्या. ‘देवच आपल्याला प्रत्येक विचार देत असतो’, हे लक्षात ठेवून प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करा. सेवा करतांना आपल्याला काहीतरी सुचले, तर ‘ते योग्य आहे का ?’, हे देवालाच विचारा. ‘सेवा आणखी चांगली होण्यासाठी काय करू ?’, असे देवाला सतत विचारा. सेवा करत असतांना येणार्‍या अनुभूती घ्या, तसेच शिकण्यातील आनंद घ्या. सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे इतरांनाही सांगा, म्हणजे व्यापकत्व वाढेल. यातून अंतर्मनाची साधना होईल.

४. गुरुसेवा परिपूर्ण होण्यासाठी काय करावे ?

४ अ. सेवा करतांना ती यंत्रवत् होऊ नये, यासाठी करायचे प्रयत्न : ‘अनेकदा पुष्कळ वर्षे साधना करत असलेल्या; पण प्रगती न झालेल्या साधकांच्या सांगण्यात असते की, आमची सेवा यांत्रिक पद्धतीने (मेकॅनिकली) होते.

यावर उपाय म्हणजे ‘सेवा करतांना देव काय शिकवत आहे ? आजूबाजूच्या साधकांचे साहाय्य कसे घ्यायचे ? सेवा नेहमीच्याच असल्यामुळे सेवेत येणार्‍या ‘तोचतोपणा’वर मात कशी करायची ?’, हे पहायला हवे. या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.

४ अ १. देव सेवेतील सर्व गोष्टी एकाच वेळी न सुचवता थोडे थोडे सुचवत असल्याने त्याने सुचवल्याप्रमाणे सेवेत मार्गक्रमण करत गेल्यास सेवा सहजतेने पूर्ण होत असणे : एखादी नवीन सेवा करायची असली की, तिच्याविषयी अनुभव नसल्याने ‘गुरुसेवेत पुढे कसे जायचे ?’, असा प्रश्न बहुतेकांना पडतो. त्यामुळे सेवा कठीण वाटते; पण ‘देव आपल्याला सुचवत असतो’, हे लक्षात घेतले, तर आनंद मिळतो. सेवा करतांना हा दृष्टीकोन ठेवायला हवा. देव सर्व गोष्टी एकाच वेळी सुचवत नाही. तो थोडे थोडे सुचवतो. देवाने सुचवल्याप्रमाणे कृती केली की, देव आणखी पुढचे सुचवतो. अशा प्रकारे आपल्याला सेवेतील पुढचा पुढचा मार्ग मिळत जातो आणि सेवा सहजतेने पूर्णत्वाला जाते. यासाठी देवावर श्रद्धा ठेवायला हवी आणि त्याचे आज्ञापालन करायला हवे.

४ अ २. सेवा करतांना शिकण्याची दृष्टी असल्यास आनंद मिळून उत्साह वाढल्याने सेवेत तोचतोपणा न रहाणे : सेवा करतांना शिकण्याची दृष्टी ठेवली, तर आनंद मिळतो. आनंद मिळाला की, उत्साह येतो. त्यामुळे प्रतिदिन तीच तीच सेवा असली, तरी ‘त्या सेवेतून काय शिकायला मिळते ?’, याची उत्कंठा असायला हवी.

४ अ ३. सेवा करतांना पुढचे पुढचे सुचण्यासाठी देवाला शरणागतभावाने विचारत रहाणे आवश्यक असणे आणि आपल्याला शिकायला मिळालेले इतरांना सांगितल्याने आपला आनंद द्विगुणित होत असणे : आपल्याला जेवढे सुचले, तेवढ्यावर अल्पसंतुष्ट रहायचे नाही. देवाला सतत विचारत रहायचे आणि शिकत जायचे. आपल्याला जे शिकायला मिळाले, ते इतरांना सांगू लागलो, तर आपला आनंद द्विगुणित होतो. सेवा करतांना प्रत्येक वेळी लगेच सुचते असे नाही. यासाठी शरणागती हवी. असे केले की, परिपूर्ण सेवेची तळमळ लागते.

४ अ ४. प्रमुख साधकांनी निरनिराळे पालट का सांगितले ? हे समजून घेतल्यास त्यातून परिपूर्ण सेवेची तळमळ निर्माण होऊन ईश्वराचे साहाय्य लाभणे : ‘प्रमुख साधक एकाच सेवेविषयी एखाद्या दिवशी एक सांगतात आणि आणखी एखाद्या दिवशी वेगळे सांगतात. ‘सेवेतील दृष्टीकोनाविषयी असा पालट का होतो ?’, याचा अभ्यास करायला हवा. याविषयी कळले नाही, तर विचारून घ्यायला हवे. मनात कोणतीही शंका रहायला नको. यातून परिपूर्ण सेवेची तळमळ निर्माण होते आणि तळमळ निर्माण झाली की, ईश्वराचे साहाय्य मिळते. सेवा करतांना भावजागृती, अंतर्मनाची साधना होणे, तळमळ वाढणे आणि अहं न्यून करणे यांकडे लक्ष द्यायला हवे.

४ आ. एकमेकांच्या साहाय्याने सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : सेवा करतांना जे जमत नाही, त्याविषयी इतरांना विचारावे. ‘एखादी कृती किंवा सेवा केवळ मलाच कळते’, असा विचार न करता इतरांना विचारून ती पूर्ण करावी. एकमेकांच्या साहाय्याने सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

४ इ. सेवा करतांना सहसाधकांशी मतभिन्नता झाल्यास काय करावे ? : ‘काही वेळा सेवेसंबंधी आपले एक मत आणि सहसाधकाचे दुसरे मत असते. अशा वेळी आपण माघार घेतो आणि सहसाधकाच्या मतानुसार वागतो; परंतु काही वेळा आपले अधिक योग्य असल्याचे वाटल्याने मनात रुखरुख रहाते. अशा वेळी देवाला ‘अधिक योग्य काय आहे ?’, हे प्रार्थनापूर्वक विचारावे आणि आपले मत योग्य वाटत असेल, तर ते सहसाधकाला सकारण समजावून सांगावे. त्याने मतभिन्नता दूर होते. त्यानंतरही समोरच्या साधकाला न पटल्यास त्रयस्थ साधकाचे मत घ्यावे; परंतु कोणत्याही स्थितीत सूत्र अर्धवट सोडून देऊ नये. नाहीतर तो विचार आपल्या मनात रहातो आणि पुढच्या सेवेत आपले मन लागत नाही.

४ ई. प्रत्येक कृती ‘सत्यम्, शिवम् आणि सुंदरम्’ करण्यासाठी प्रयत्न करणे : आपल्याकडून सेवा न होता काम होत असेल, तर त्याचे रूपांतर सेवेत होण्यासाठी सतत प्रयत्न करायचे. प्रत्येक कृती ‘सत्यम्, शिवम् आणि सुंदरम्’ करण्यासाठी प्रयत्न करावेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रत्येक कृती ‘सत्यम्, शिवम् आणि सुंदरम्’ असते. आपण एखादी कृती करायला आरंभ करतो, तेव्हा ‘त्यांनी ही कृती कशी केली असती ?’, हा विचार करून ती कृती करावी.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२३)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/738774.html