सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

‘पुष्कळ वर्षे साधना करूनही प्रगती न झालेल्या काही साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा सत्संग लाभला. त्यांनी त्या साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मनमोकळेपणाने वागण्याचे महत्त्व, भाव कसा वाढवावा ? आणि गुरुसेवा परिपूर्ण होण्यासाठी काय करावे ?’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/734832.html

(भाग २)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

४. गुरुसेवा परिपूर्ण होण्यासाठी काय करावे ?

४ ई १. नमुन्याकरता काढायच्या छायाचित्राच्या प्रयोगातही ‘साधकाचे छायाचित्र योग्य दिसेल’, असेच काढणे आवश्यक असल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे : एकदा छायाचित्रांचा एक प्रयोग चालू होता. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘छायाचित्र नमुन्याकरता (rough) काढूया’, असे म्हटले होते. तसे छायाचित्र काढल्यावर त्या छायाचित्रामध्ये एका साधकाचे आतले वस्त्र (बनियन) दिसत होते. तेव्हा त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि सांगितले, ‘‘नमुन्याकरता जरी छायाचित्र काढलेले असले, तरी ते योग्य असेच काढायला हवे. आपली प्रत्येक कृती परिपूर्णच हवी आणि तशी सवय आपल्याला लागायला हवी.’’ यावरून ‘प्रत्येक कृती चांगलीच केली पाहिजे’, हे वळण त्यांनी त्या वेळी लावले.

४ उ. इतरांकडून परिपूर्ण सेवा करून घेणे

४ उ १. आपत्काळात इतरांवर अवलंबून राहू नये ! : ‘आपत्काळात आपण कोणत्याच गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून रहायला नको. साधकांवर कोणतीच गोष्ट सोडून द्यायला नको. आपण सतत पाठपुरावा घ्यायला हवा. ‘दुधाने जीभ पोळली की, ताकही फुंकून प्यावे लागते’, तशी स्थिती आता आपत्काळात आली आहे.

४ उ २. इतरांकडून सेवा करून घेतांना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवल्यास, त्यांच्या सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना केल्यास आणि त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्याशी जवळीक निर्माण होणे : आपल्याकडे सेवेचे दायित्व असले, तरी अन्य साधकांकडून अधिकाराने नव्हे, तर प्रीतीने सेवा करवून घेता आली पाहिजे, तरच आपल्याला अपेक्षित अशी सेवा त्यांच्याकडून होऊ शकते. प्रीतीने सेवा करवून घेण्यासाठी त्यांच्याशी आधी जवळीक झाली पाहिजे. साधकांना ‘सेवा करतांना काही अडचणी येत आहेत का ? त्यांना अन्य कोणत्या, उदा. वैयक्तिक अडचणी आहेत का ?’, हे विचारावे. साधकांच्या सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थनाही करू शकतो. साधकांची मधून मधून चौकशी करावी. त्यांना प्रोत्साहन द्यावे. चुका होत असतील, तर त्यांना समजावून सांगाव्यात. यातून सेवा परिपूर्ण होण्यास साहाय्य होते आणि आनंदही मिळतो, तसेच साधकांशी जवळीकही होते. साधकांप्रती आपला सतत कृतज्ञताभाव हवा. असे केल्यास देव साहाय्य करतो.

४ उ ३. सहसाधकाच्या सेवेमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न केल्यास समष्टी भाव आणि व्यापकता निर्माण होणे : सहसाधकाच्या सेवेमध्ये येणारे अडथळे सहज दूर होत नाहीत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसे प्रयत्न केले, तर ते अडथळेही दूर होतील आणि आपल्यात समष्टी भावही निर्माण होईल. समष्टी भाव म्हणजे व्यापकता ! सर्वांगांनी विकसित व्हायचे असेल, तर अशा प्रकारे प्रयत्न करावेत. त्यामुळे साधकातही आपल्याविषयी प्रीती निर्माण होते.

४ उ ४. दुसर्‍या साधकाला सेवा देतांना गुरुसेवेवर परिणाम होऊ नये; म्हणून त्याला वाईट शक्तींचा त्रास असल्यास त्याची अडचण समजून घेऊन ती आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून सोडवणे आवश्यक ! : दुसर्‍या साधकाला सेवा दिली आणि जर वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्याच्याकडून सेवा झाली नाही, तर गुरुसेवेवर परिणाम होतो; म्हणून आपण त्याच्यावर लक्ष ठेवावे. ‘त्या साधकाला वाईट शक्तींचा त्रास आहे का ? त्याच्याकडून कशामुळे सेवा होत नाही ?’, हे आपण समजून घ्यावे. आपण आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून त्याची अडचण सोडवली, तर त्याच्याशी आपली जवळीक वाढायला साहाय्य होते आणि आपली सेवाही मार्गी लागते.

४ ऊ. गुरुसेवा चांगली केल्याने आपल्यातील साधनेची तळमळ वाढते आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते.

४ ए. सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे प्रतिदिन लिहून ती आत्मसात् करणे आणि समष्टीच्या लाभासाठी सर्वांपर्यंत पोचवणे आवश्यक ! : सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे प्रतिदिन लिहून ठेवायला हवीत. त्यामुळे ती सूत्रे समजून घेऊन त्यांवर चिंतन करून ती आत्मसात् करणे शक्य होते, तसेच सेवेविषयी असलेल्या शंकाही विचारता येतात. ही सूत्रे समष्टीच्या लाभासाठी सर्वांपर्यंत पोचवावीत. यामुळे सर्वांनाच त्यांचा लाभ होऊन आपली समष्टी साधना होते.

५. सेवेत स्वतःकडून आणि इतरांकडून होणार्‍या चुका दुरुस्त करण्यासंदर्भात करायचे प्रयत्न

५ अ. स्वतःच्या चुका समजण्यासाठी विचारांच्या स्तरावर निरीक्षण करणे आवश्यक ! : आपल्याकडून होणार्‍या चुका आपल्याला समजत नसतील, तर विचारांच्या स्तरावर निरीक्षण करायला पाहिजे; कारण विचार अधिक घातक असतात आणि ते तसेच ठेवले, तर त्यांचा स्फोट होऊ शकतो. चुकीची कृती परवडली; पण विचार नाही. विचार मनात ठेवू नयेत. ते लगेच लिहून काढावेत.

५ आ. चुका सुधारण्यासाठी मनात येणारे अयोग्य विचार पाहून त्यांचे मूळ काढायला हवे : मनाकडे सतत लक्ष द्यायला हवे. त्यातून आपल्याला आपल्या चुकाही कळतात. मनाच्या विचारप्रक्रियेकडे लक्ष देऊन ती दुरुस्त करावी. ‘एखादा विचार आला, तर त्यावर मात कशी करू शकतो ?’, हे पहायला हवे. अयोग्य विचार पाहून त्याचे मूळ काढायला हवे. ‘मनात अपेक्षा आणि कर्तेपणा का आहे ?’, ते पहायला हवे. मनात योग्य विचारांची संख्या वाढत गेली, तर त्यानुरूप कृती होते. असे केले, तर अंतर्मुखता येते.

५ इ. चुका टाळण्यासाठी देवाला परत परत आळवून देवाचे साहाय्य घ्या ! : ‘पहिला विचार देवाचा असतो आणि तो विचार सुटला, तर सेवेत चूक होते’, अशी अडचण काही साधकांना येते. अशा वेळी ‘देवाचा विचार सुटला’, असा विचार करू नये. देव परत सुचवतच असतो. आपण विसरलो, तरी देवाला आळवत रहायला हवे. देव दयाळू आहे. तो आपल्याला सुधारून घेतो.

५ ई. दुसर्‍याने चूक केल्यास ती सांगणे टाळू नये : दुसर्‍याने एखादी चूक केल्यास ‘असू दे. त्याला सांगायला नको’, असे म्हणू नये. त्याला चांगल्या प्रकारे सांगा, प्रतिक्रियात्मक नको.

५ उ. एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली, तरी साधकाचे सगळे स्वभावदोष गेलेले नसल्याने त्याला त्याची चूक सांगावी : ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी झाली, म्हणजे स्वभावदोष नाहीत’, असे नाही. स्वभावदोष आहेत; पण त्याच्यात काही तरी गुण आहे; म्हणून ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे’, हे लक्षात ठेवून त्याला त्याची चूक सांगावी.

६. साधना सतत चालू रहाण्यासाठी करायचे प्रयत्न

६ अ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित व्हायला हवेत.

६ आ. प्रत्येक अर्ध्या घंट्याला साधनेचे प्रयत्न, स्वतःकडून झालेल्या चुका इत्यादींचा आढावा घेणे : प्रत्येक अर्ध्या घंट्याने स्वतःचा आढावा घ्यावा. आपण साधनेचे कोणते प्रयत्न केले ? साधनेत आपण कुठे अल्प पडलो ? स्वतःच्या कोणत्या चुका लक्षात आल्या ? इत्यादींचा अभ्यास करावा. प्रत्येक कृती करतांना आपण साधना म्हणून कोणते प्रयत्न करणार ? हे पूर्वीच ठरवून घ्यावे आणि कृती झाल्यानंतर त्यांचा आढावा घ्यावा.

६ इ. सेवा करतांना नामजप होणे आवश्यक ! : नामजप वाढायला हवा. सेवा करतांना मधे मधे नामजप व्हायलाच हवा. देवाच्या अनुसंधानात राहिल्यास प्रत्येक कृती ‘साधना’ म्हणून होईल.

६ ई. स्वभावदोषांवर प्रतिदिन आणि नियमितपणे स्वयंसूचना देणे आवश्यक असणे, अन्यथा नामजपात खंड पडून भावजागृती न होणे : नामजप चालू राहिला, तर स्वभावदोष अल्प होतात; पण जे स्वभावदोष अधिक त्रास देतात, त्यांच्यासाठी स्वयंसूचना द्यायला हव्यात. स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रतिदिन आणि नियमितपणे स्वयंसूचना देणे अन् त्यांनुसार कृती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष अधिक असतील किंवा एखादा अहंचा पैलू तीव्र असेल, तर नामजपात खंड पडतो. पर्यायाने भावजागृती होत नाही.

६ उ. दैनंदिन कृती करतांना भाव ठेवल्यास २४ घंटे साधना होऊ शकणे आणि सध्याचा काळ भीषण असल्याने कठोर प्रयत्न करणे आवश्यक असणे : दैनंदिन कृती करतांना भाव ठेवला, तर २४ घंटे साधना होऊ शकते. हे लगेच शक्य होणार नाही; परंतु करत राहिलो, तर अंगवळणी पडेल. याचा दर अर्ध्या घंट्याने आढावा घ्यावा. आढावा घेतला, तर आपल्याला जाणीव होते, ‘आपण या कालावधीत काय केले ?’ एखादी कृती करतांना भाव ठेवला नसेल, तर शिक्षापद्धत अवलंबावी. प्रत्येक कृती करतांना ‘ती कुणासाठी करतो ? कशासाठी करतो ?’, यांचा विचार करायला हवा. असे प्रयत्न अखंड करायला हवेत. सध्याचा काळ भीषण आहे आणि वाईट शक्तींचा जोरही अधिक आहे. त्यामुळे कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे, तरच प्रगती होईल.

६ ऊ. कोणतेही कर्म साधना म्हणून करायला हवे : साधना होण्यासाठी कष्ट करण्याची सिद्धता हवी. आपण केवळ कर्म करतो; पण ते कर्म साधना म्हणूनच व्हायला हवे. साधना म्हणून न केल्याने आपण मागे रहातो.

६ ए. प्रतिदिन तळमळीने साधना झाली, तरच प्रगती होत असणे : आता तीव्र आपत्काळ असल्यामुळे वर्षाला जेमतेम १ टक्का प्रगती होत आहे. प्रतिदिन तळमळीने साधना झाली, तरच गुरुकृपा होऊन प्रगती होऊ शकते.

६ ऐ. स्वतःतील सकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी साधना नियमित आणि अधिक गांभीर्याने करणे महत्त्वाचे ! : सध्या वातावरणातील नकारात्मक शक्ती (निगेटिव्हिटी) अतिशय वाढलेली आहे. त्यामुळे तिच्या विरुद्ध लढून आपल्याला स्वतःतील सकारात्मक शक्ती (पॉझिटिव्हिटी) वाढवावी लागेल; म्हणून साधना नियमित आणि अधिक गांभीर्याने करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे स्वतःतील नकारात्मक शक्ती न्यून करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांमध्ये सातत्य हवे.

६ ओ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या अष्टांग साधनेमुळे साधकांच्या सर्व देहांची शुद्धी होणे : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् नामजप यांमुळे स्थूलदेहाची शुद्धी होते. भाव जागृत होणे, सत्संग आणि सत्सेवा यांनी मनोदेह शुद्ध होतो. त्यागाने कारणदेह आणि प्रीतीने महाकारणदेह शुद्ध होतो. साधकांच्या सर्व देहांची शुद्धी होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अष्टांग साधनेद्वारे प्रयत्न करण्यास सांगितले आहे. अष्टांग साधना हा साधनेचा कणा आहे.

६ औ. स्वतःला पालटण्यासाठी आणि सतत शिकत रहाण्यासाठी तळमळ आवश्यक आहे.

६ अं. साधनेत प्रगती झाल्यास साधक करत असलेली प्रत्येक कृती परिणामकारक, तसेच प्रभावी होणे : ६० टक्के पातळीचे महत्त्व, म्हणजे ६० टक्के सत्त्व गुण असल्याने ती गाठल्यावर आपण जे काही करतो, उदा. वैद्यकीय सेवा, गायन, अध्यात्माचा प्रसार करणे इत्यादी, ते परिणामकारक अन् अधिक प्रभावी होते. अन्यथा आपण दुसर्‍यांना सकारात्मकता (चैतन्य) देऊ शकत नाही.’

(समाप्त) 

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी साधनेसंदर्भात बोलतांना त्यांच्यासंबंधी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. सद्गुरु डॉ. गाडगीळकाका अष्टांग साधनेसंदर्भात सूत्रे सांगत असतांना ते ती अत्यंत नम्रपणे, प्रांजळपणे, तसेच अतिशय पारदर्शकतेने सांगत होते.

२. त्यांनी त्यांना पू. वामन (सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर, वय ५ वर्षे) यांच्यासंदर्भात जाणवलेली सूत्रेही सांगितली.

३. कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही. कार्यकारणभावाने घडते, हे त्यांनी सांगितले.

४. त्यांचे बोलणे ऐकतांना पुष्कळ शांत वाटत होते.

५. ‘त्यांचे बोलणे संपल्यानंतर आणखी काही न बोलता, शांतच बसून रहावे’, असे आम्हाला वाटले.’

– डॉ. दुर्गेश सामंत आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.