सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – वाई येथील बावधन नाका परिसरात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. या वेळी संशयिताकडून ३ गावठी पिस्तूल, २ गावठी कट्टे, जिवंत काडतूस, रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्य प्राण्यांची शिंगे, वाघनखे असा ६ लाख २० सहस्र रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला असून पोलीस अभिलेखावरील संशयित अविनाश मोहन पिसाळ यांना कह्यात घेण्यात आले आहे.
२९ ऑक्टोबर या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेला अविनाश पिसाळ यांच्याकडे अनधिकृत देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची, तसेच पिसाळ यांना शिकारीचा छंद असून त्यांच्याकडे वन्य प्राण्यांची शिंगे आणि वाघनखे असल्याचीही माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक निर्माण करून वाई शहरातील बावधन नाका येथे जाऊन कारवाई केली.
पोलीस अभिलेखावरील संशयित वन विभागाच्या सीमेत जाऊन शिकार करतो; मात्र याची कल्पना वन विभागाला नाही, असे कसे होऊ शकते ? यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जात आहे.