गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर रोगराई होण्यासारखे प्रदूषण ! – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – उत्तर गोव्यातील प्रसिद्ध मिरामार, कळंगुट, मोरजी, तेरेखाल आणि वागातोर, तसेच दक्षिण गोव्यातील मोबोर, बायणा, वेळसांव, कोलवा आणि गालजीबाग समुद्रकिनारे प्रदूषित झालेले आहेत. येथील पाण्यामध्ये मनुष्य किंवा प्राणी यांची विष्ठा आढळली आहे, तसेच पाण्यातील ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ (बीओडी) मध्ये वाढ झालेली आहे. विष्ठा आणि ‘बीओडी’ यांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आहे. यामुळे पाण्यामध्ये घातक रोगजनक विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती प्रसारित झालेली आहे.


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालात दिलेल्या माहितीनुसार नियमानुसार आंघोळीच्या किंवा पाण्यात क्रीडा प्रकार करण्यासाठी विष्ठेचे प्रमाण प्रति १०० मि.लि. पाण्यामध्ये १०० ‘एम्.पी.एन्.’ (मोस्ट प्रॉबेबल नंबर) पेक्षा अल्प संमत आहे, तर ‘बीओडी’चे प्रमाण प्रतिलिटर ३ मिलिग्रॅम असले पाहिजे; मात्र मंडळाने वर्ष २०२२-२३ या काळात केलेल्या गोव्यातील समुद्रकिनार्‍यावरील पाण्याच्या सर्वेक्षणात पाण्यातील विष्ठेचे प्रमाण प्रति १०० मि.लि.मध्ये ५०० ते १ सहस्र १०० या श्रेणीमध्ये आढळले आहे, तर ‘बीओडी’चे प्रमाण प्रतिलिटर १.९ ते २.९ मी. ग्रॅम आढळले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी समुद्रात गटारातील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. अनेक ठिकाणी उघड्यावर शौचाला बसतात. या कारणांमुळे समुद्रकिनारे प्रदूषित होत आहेत. यांवर सरकारमधील विविध खाती, पंचायतीसारख्या स्वायत्त संस्था, गोवा राज्य प्रदूषण नियंणत्र मंडळ आदींनी तातडीने उपायोजना केल्या पाहिजेत.

संपादकीय भूमिका

केवळ अहवाल नको. प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच या अहवालांना अर्थ आहे, अन्यथा प्रशासनाने कागदी घोडे नाचवल्यासारखे होईल !