भुईपाल, सत्तरी येथील जुगाराच्या विरोधात स्थानिक आंदोलन छेडण्याच्या सिद्धतेत

वाळपई, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – वाळपई-होंडा मार्गावरील भुईपाल येथे एका घरात गेल्या काही दिवसांपासून जुगारअड्डा चालू झाला आहे. येथे सायंकाळी ७ वाजता चालू झालेला जुगार दुसर्‍या दिवशी पहाटे बंद होतो. या अड्ड्यावर निरनिराळ्या भागांतून जुगारवाले खेळण्यासाठी येतात. या जुगारअड्ड्याचे दुष्परिणाम स्थानिकांना भोगावे लागत आहेत. हा जुगारअड्डा त्वरित बंद करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याची चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

या अड्ड्यावर लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हा जुगारअड्डा म्हणजे एक प्रकारे कॅसिनो आहे. या ठिकाणी पैशांची उधळपट्टी केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हा अड्डा बंद करण्यासाठी लेखी निवेदन देऊनही त्याकडे शासन किंवा पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी हा अड्डा बंद करण्यासाठी प्रयत्न केले असता त्यांना धमक्या देण्यात आल्या. ‘कोणत्याही परिस्थितीत हा जुगारअड्डा बंद करावा’, अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांची निष्क्रीयता किंवा त्यांचे जुगारवाल्यांशी असलेले साटेलोटे यांमुळे स्थानिक ग्रामस्थांना जुगार बंद करण्यासाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !