Israel-Palestine Conflict : इस्रायलने हमासच्या शेकडो ठिकाणांवर आक्रमण करून शस्त्रास्त्रांची गोदामे केली उद्ध्वस्त !

इस्रायलने बहरीन, जॉर्डन आणि मोरक्को या इस्लामी देशांमधील दूतावास केले बंद !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला आता २ आठवडे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत दोन्हीकडील एकूण ५ सहस्रांहून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायली वायूसेनेने हमासच्या शेकडो ठिकाणांवर आक्रमण करून त्यांची अनेक शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या सुरुंग, युद्ध सामुग्री ठेवणारी गोदामे आणि त्यांच्या संचालनाची विविध मुख्यालये यांवर आक्रमण करून त्यांना नष्ट केले. आतंकवाद्यांना शह देणार्‍या जबलिया येथील एक मशीदही नष्ट करण्यात आली. इस्रायलच्या हवाई आक्रमणात गाझातील ‘सेंट पोर्फिरियस ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च’चीही हानी झाली आहे.

१. गाझामधील रुग्णालयावर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात इस्रायली मंत्री ए.व्ही. डाइचर म्हणाले की, हमासने जनावरांच्या पद्धतीने लोकांवर आक्रमण केले आहे. आम्ही या मानवी जनावरांना लक्ष्य करत आहोत. कुणीही पळू शकणार नाही !

२. हमासशी चालू असलेल्या युद्धाची भयावहता पाहून इस्रायलने त्याचे अनेक दूतावास बंद केले आहेत. यांमध्ये इस्लामी देश बहरीन, जॉर्डन आणि मोरक्को यांचा समावेश आहे. यासह इस्रायलने लेबनॉन सीमेच्या परिसरातील त्याच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवले आहे. २३ सहस्र लोकसंख्या असलेल्या किर्यत शमोना भागाला पूर्णपूणे रिकामे करण्यात आले आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा दौरा !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी इस्रायलचा दौरा केल्यानंतर ते आता मध्यपूर्वेतील देशांच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. २० ऑगस्ट या दिवशी ते इजिप्तला पोचले. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी यांची त्यांनी या वेळी भेट घेतली. याआधी त्यांनी सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांची भेट घेतली. सलमान यांच्या भेटीनंतर सुनक यांनी ट्वीट करत म्हटले की, या क्षेत्रात युद्ध आणखी वाढू नये, गाझाला महत्त्वपूर्ण मानवीय साहाय्य प्रदान करण्यात यावे, तसेच क्षेत्रात स्थैर्य आणण्यास समर्थन करणे यांसाठी मी मध्यपूर्व देशांचा दौरा करत आहे.

दुसरीकडे रशियाने गाझा येथे २७ टन जीवनोपयोगी साहाय्य पाठवले आहे. यांमध्ये कणीक, साखर, तांदूळ आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.