मुंबई पोलिसांची कामगिरी !
मुंबई – अमली पदार्थाचा तस्कर ललित पाटील याला साकिनाका पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. २ ऑक्टोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. त्याला न्यायालयात उपस्थित केल्यानंतर २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ललित पाटील याची अवैध अमली पदार्थ बनवण्याची उलाढाल ३०० कोटी रुपये आहे. त्याचे जाळे देशभरात पसरले आहेत. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना कठीण गेले. ‘ललित पाटील हा श्रीलंकेमध्ये जाण्याच्या सिद्धतेत होता’, असा दावा करण्यात येत आहे.
‘मी ससूनमधून पळालो नाही; मला पळवून नेले. यात कुणाचा हात आहे, कुणाचा सहभाग आहे, त्या सर्वांची नावे मी सांगणार आहे’, असा गौप्यस्फोट ललित पाटील याने त्याला न्यायालयात नेत असतांना प्रसिद्धीमाध्यमांसमोर केला.
ललितला या प्रवासात कुणी साहाय्य केले ?, त्याच्यासह कोण होते ? या सर्वांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
ललित पाटील याच्या अटकेमुळे अमली पदार्थाचे मोठे जाळे बाहेर येईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
ललित पाटील याच्या अटकेमुळे अमली पदार्थांचे मोठे जाळे बाहेर येईल. ही माहिती जेव्हा बाहेर येईल, तेव्हा अनेकांची तोंडे बंद होतील. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी केली जाणार आहे. कुणालाही सोडणार नाही. ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. (पोलिसांनी वेळीच काम न केल्याने महाराष्ट्र अमली पदार्थ मुक्त नाही, हे सत्य लज्जास्पद आहे ! – संपादक)