कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अमेरिकेतून सुनावले !

जयशंकर यांनी अमेरिकेतून सुनावले

वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडा आणि कॅनडा सरकार समवेत जी काही समस्या निर्माण झाली आहे ती गेल्या काही वर्षांतील आहे. ही समस्या आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक देण्यावरून निर्माण झाली आहे. आम्ही कॅनडामध्ये असणार्‍या काही गुन्हेगारांना भारताकडे सुपुर्द करण्याची मागणी केली होती; मात्र कॅनडाकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरूनही कॅनडामध्ये गुन्हेगारांना कशी मोकळीक दिली जात आहे, हे लक्षात येते, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी कॅनडाला सुनावले. ते सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘ज्यांची आम्ही मागणी केली आहे, ते भारतात हिंसाचार आणि कायदाद्रोही कारवायांमध्ये सहभागी आहेत अन् स्वतःच त्यांनी याची स्वीकृती दिलेली आहे; म्हणजेच ही माहिती कुठेही लपून राहिलेली नाही’, असेही डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

खलिस्तानची मागणी काही मोजक्या लोकांचीच !

डॉ. जयशंकर म्हणाले की, मला नाही वाटत की, आजकाल जी चर्चा (खलिस्तानची) होत आहे ती संपूर्ण शीख समाजाचे प्रतिनिधित्व करते. जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात ते अतिशय अल्प जण आहेत. त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये.