छत्रपती संभाजीनगर – मागील १ मासाच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत २४ जणांवर कुत्र्याने आक्रमण केले. त्यात सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मागील १० वर्षांत कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार ४ वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांची संख्या अनुमाने ४० सहस्र होती. आतापर्यंत ही संख्या ५० सहस्रांपर्यंत गेली आहे.
मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी महानगरपालिकेने वर्ष २०२१ मध्ये निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी निविदा काढली होती. त्यात एका एजन्सीला (संस्थेला) वर्ष २०२१ ते २०२४ या कालावधीत शस्त्रक्रियेचे काम देण्यात आले होते; मात्र संबंधित एजन्सीला काम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. परिणामी शहराच्या प्रत्येक वसाहतीमध्ये मोकाट कुत्र्यांच्या आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. (मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू न शकणारी महानगरपालिका नागरिकांना सोयीसुविधा वेळेत देण्यासाठी काय प्रयत्न करणार ? – संपादक)